नवी मुंबई येथे होत असलेले नवीन आंतर राष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनही केले होते. मात्र या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी होत होती. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी, २८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांना या विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मोठे आंदोलन नवी मुंबईत सुरू होते. सरकारकडून या विमानतळासाठी शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. मंगळवारी, २८ जून रोजी नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला काहीच हरकत नसल्याचे म्हटले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंचे नाराज आमदारांना आवाहन ‘एकत्र बसून मार्ग काढू!’! वाचा पत्र जसेच्या तसे…)
सिडकोवर कार्यालयावर मोर्चा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शुक्रवारी, 24 जून रोजी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे दि बा पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त सिडको कार्यालयाला घेराव घातला होता. मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त या आंदोलनासाठी आले होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात होते.
असा पेटला वाद
या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत होती, त्याच वेळी या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून होत होती, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे विमानतळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग असल्याने याही विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका मांडली होती.
Join Our WhatsApp Community