काँग्रेसच्या नानांवर आता मुख्यमंत्रीही नाराज

नानांची सातत्याने स्वबळाची आणि महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी वक्तव्ये आता डोकेदुखी ठरत आहेत.

नाना पटोले… काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. पण गेल्या काही दिवासांपासून स्वबळाची भाषा करू लागल्याने प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले चांगलेच चर्चेत आले असून, त्यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी चांगलीच अडचणीत सापडली आहे. स्वबळाची भाषा करणाऱ्या नानांवर आता खुद्द मुख्यमंत्री देखील नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नानांसारख्या ज्येष्ठ नेत्याने अशा पद्धतीने महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशी भावना सध्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे. आधीच प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा समोर आली असून, नानांची सातत्याने स्वबळाची आणि महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी वक्तव्ये आता डोकेदुखी ठरत आहेत.

राजीनाम्यावरुनही मुख्यमंत्री नाराज

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावरुन आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज झाले होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत असताना नानांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांना पटलाच नव्हता. नानांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे तेव्हा मुख्यमंत्र्यांचे मत होते. विशेष म्हणजे त्यावेळी सामनाच्या अग्रलेखातून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

(हेही वाचाः नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात?)

सामनातून नाराजी

काँग्रेसला पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद दिले होते. तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील हे माहीत नव्हते. घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार घ्याव्या लागणे चांगले नाही. विधानसभा अध्यक्षाच्या पदावर तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. मात्र, तीन पक्षांच्या बहुमताचे सरकार असल्याने हे टाळायला हवे होते, असे संजय राऊत त्यावेळी म्हणाले होते. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार आहे. पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल, असेही सामनाच्या अग्रलेखात सुचवण्यात आले होते.

(हेही वाचाः स्वबळाची भाषा करणारे नाना नरमले)

प्रदेशाध्यक्ष होताच नानांची स्वबळाची भाषा

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष होताच नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा करायला सुरुवात केली. विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल अशी सुरुवात करणारे नाना आजही स्वबळाचीच भाषा बोलत आहेत. दोन दिवसांपूर्वी जळगावमध्येही नाना पटोले यांनी आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. निवडणुकांना अजून तीन वर्ष बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, असे नाना पटोले म्हणाले.

(हेही वाचाः ‘नानां’च्या आक्रमकतेमागे नक्की कारण काय? वाचा…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here