मुंबई महानगरपालिकेच्या बाई य.ल. नायर रुग्णालयाच्या शतकपूर्तीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा केली. परंतु हा निधी जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सवयीप्रमाणे मुंबई महापालिकेच्याच खिशात हात घातला आहे. रुग्णालयाच्या शतकपूर्तीनिमित्त राज्य शासन आणि महापालिका या दोहोंकडून संयुक्त १०० कोटींचा विशेष निधी रुग्णालयास देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. हे रुग्णालय मुंबई महापालिकेचे असून त्यावरील सर्व निधी हा महापालिकेच्या तिजोरीतून होतो. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने किती रुपयांचा निधी देणार याची रक्कम न सांगताच महापालिकेच्या खिशातच हात घालत मुख्यमंत्र्यांनी आपला दानशुरपणा दाखवला.
मुंबई महानगरपालिकेच्या बाई य.ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा शनिवारी, ४ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई सेंट्रलस्थित बाई य.ल. नायर रुग्णालयाच्या सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी बोलतांना त्यांनी, नायर रुग्णालय उभारणीसाठी अनेक दात्यांनी या संस्थेला दान दिले. त्याच धर्तीवर रुग्णालयाच्या शतकपूर्ती निमित्त राज्य शासन आणि महानगरपालिका या दोहोंकडून संयुक्तपणे एकूण १०० कोटींचा विशेष निधी नायर रुग्णालयास देण्यात येईल, अशी घोषणा केली. या निधीतून आणि १०० वर्षपूर्ती निमित्ताने असे भविष्यवेधी काम करुन दाखवा की, ते पुढील १०० वर्षांसाठी उपयोगी ठरेल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. रुग्णालयाची गौरवाशाली वाटचाल शतकानुशतके सुरु राहो, अशा शुभेच्छा अखेरीस त्यांनी व्यक्त केल्या.
(हेही वाचा : देव मंदिरातच नाही, तर रुग्णालयातही! मुख्यमंत्र्यांनी कुणाला सुनावले?)
मुख्यमंत्र्यांनी नायर रुग्णालयाला ‘असा’ जाहीर केला निधी!
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नायर रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे काम हाती घेण्यात आले असून त्याचे काम सध्या सुरु आहे. याशिवाय नायर रुग्णालयाकरता तसेच तेथील कोविड रुग्णांच्या उपाययोजनांवरही कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मुंबई महापालिकेच्यावतीने आवश्यक निधीची तरतूद करून उपलब्ध करूनही दिला जातो. परंतु जो १०० कोटी रुपयांचा संयुक्त निधी दिला जाणार आहे, त्यातील राज्य सरकारचा वाटा किती याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. महापालिका आणि राज्य शासन अशी संयुक्तपणे १०० कोटी रुपयांचा विशेष निधीची घोषणा त्यांनी केली असली तरी त्यातील राज्याचा वाटा किती असेल हेच माहित नसल्याने केवळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापलिकेच्या खिशात हात घालून आपल्या दानशुरपणाचे दर्शन घडवले आहे.
Join Our WhatsApp Community