हा स्वातंत्र्याचा नाही जीविताचा प्रश्न आहे… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले

कोरोनाचे संकट दिसत असताना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत.

83

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत. यावरुन मनसे आणि भाजप आक्रमक झाले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र राज ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. कोरोनाचे संकट दिसत असताना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत, त्यासाठी ते आंदोलने करत आहेत. पण हे स्वातंत्र्याचे आंदोलन नाही तर जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

केंद्र सरकारचे ते पत्र दाखवायचे आहे

हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे, हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.

(हेही वाचाः बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरच्या गाड्या कमी झाल्या का? राज ठाकरे कडाडले)

ही ती परिस्थिती नव्हे

आज गर्दी करुन उत्सव साजरे करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-समारंभांविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः निवडणुका आणि लॉकडाऊनवरुन राज ठाकरेंचा सरकारवर खळबळजनक आरोप)

काय म्हणाले होते राज ठाकरे?

सर्व बंद करुन यांना प्लॅनिंग करायचे आहे मग निवडणुका जाहीर करायच्या… म्हणजे बाकीचे तोंडावर पडतील, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे ठाकरे सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. लाट यायला हा काय समुद्र आहे का? काही जाणवतं का तुम्हाला? उगाच इमारती सील करायच्या. अमेरिकेचे अमेरिका बघेल, तुमच्याकडे नाही ना. आता सर्वांना बंदी करुन ठेवायचे आणि हे सर्व निवडणुकीसाठी सुरू आहे. यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.