लॉकडाऊन करणार का? काय म्हणाले मुख्यमंत्री?

80

आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजीरोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही. पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य मुक्त करायचे आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करत नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यात वाढत्या कोरोनामुळे नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्याला महत्त्वाचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

  • कोरोनाशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाच्या दोन मोठ्या लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊले उचलत त्या रोखल्या आहेत. मात्र आता कोरोना संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा करण्यापेक्षा या संसर्गाला लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे.
  • नियम न पाळण्याऱ्या काही मूठभर लोकांमुळे आणि बेजबाबदार वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतो. यापुढे असे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले आहेत.
  • आता हळूहळू आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे. रुग्णवाढीचा वेग असाच राहिला तर सहव्याधी असलेल्यांना किंवा लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, परिणामी ऑक्सिजनची मागणीही पुन्हा वाढू शकते.
  • या लाटेत मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइन वर्कर हे विषाणूच्या संसर्गामुळे आजारी पडले आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे, असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळेच समस्या निर्माण झाली आहे, हे लक्षात घ्या. सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका. कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या.
  • शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे ही सुट्टी आहे असे समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.