शिवसेना आमदार बॅगा घेऊन वर्षावर, नजर ठेवण्यासाठी शिवसैनिकांची फौज तयार

166

10 जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात चुरशीची निवडणूक ठरणार असल्याचे दिसत आहे. भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्याकडे जिंकून येण्यासाठी लागणार मतांचा अपेक्षित कोटा नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

(हेही वाचाः कोरोना झाल्याने फडणवीसांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार का?)

मुख्यमंत्री घेणार बैठक

या निवडणुकीत मतं फुटून घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची सोमवारी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून या सर्व आणदारांची रवानगी बैठकीनंतर थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला आमदारांना बॅगा घेऊन हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहितीही मिळत आहे. इतकंच नाही तर या आणदारांवर नजर ठेवण्यासाठी शिवसैनिकांची फौजही तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः विचारही केला नसेल अशा देशातून भारतात आली राज्यसभा निवडणुकीची पद्धत)

भाजपची टीका

शिवसेनेच्या या रणनीतीवरुन आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी टीका केली आहे. काय शिवसेनेची अवस्था झाली आहे, कुठलीही निवडणूक आली ज्यामध्ये आमदारांचं मतदान होणार असेल, तर बॅगा भरून आमदारांना बसमध्ये टाकून हॉटेलमध्ये कोंबण्यात येतं. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून ही लपवालपवी शिवसेनेसाठी काही नवीन नाही, मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना कळलंच नाही, असे ट्वीट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.