लॉकडाऊन निश्चित? उद्धव ठाकरेंना हवे आता राज ठाकरेंचे सहकार्य!

आता राज ठाकरे आपल्या भावाला सहकार्य करणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 

117

वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात लॉकडाऊन लागणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, त्याची कधीही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊन लावण्याआधी मुख्यमंत्री सर्वांशी बोलत असून, आता तर त्यांनी आपले बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील फोन केला आहे. याबाबतची माहिती मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर म्हटले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आपल्या भावाला सहकार्य करणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

काय आहे मनसेच्या ट्वीटमध्ये

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केले, असे ट्वीट मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलद्वारे केले आहे.

(हेही वाचाः राज्यात लॉकडाऊन? काय आहे नेमकं मुख्यमंत्र्यांच्या मनात?)

मनसेने केला होता विरोध

मनसेने याआधी संभाव्य लॉकडाऊनला विरोध करायला सुरुवात केली होती. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तर गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आलं. त्यावेळेस राज्य सरकार आणि सर्वसामान्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात कोरोनावर कोणते वैद्यकीय उपचार करावे लागतात, त्याच्यासाठी लागणारी संसाधनं उपलब्ध आहेत, लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का? असा सवाल उपस्थित करत लॉकडाऊनला विरोध केला होता. औरंगाबाद शहरातही लॉकडाऊनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी खुद्द राज ठाकरे यांना फोन करत सहकार्य करा, असे सांगितले आहे.

सर्व पक्षांना केले होते आवाहन

मधल्या काळात कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनावर आपण मात केलेली नाही. लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करू नका. सरकार जी पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केले होते.

(हेहा वाचाः मुंबईतील मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची धाव, महापालिकेच्या कोविड रुग्णालयाकडे पाठ!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.