राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधली नाराजी ही सातत्याने समोर आली आहे. आता यामध्ये गृह कलहाची भर पडली आहे. राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात कुचराई करत आहे, त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात गृहखात्यावरुन चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.
पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या नाराजी नाट्याला पूर्णविराम दिला आहे. आघाडीत बिघाडी असल्याच्या बातम्या या चुकीच्या असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जीएसटी भवनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
(हेही वाचाः ‘मी सुरू केलं, यांनी रखडवलं! त्यामुळे…’ फडणवीसांचा खोचक टोला)
काय म्हणाले मुख्यमंत्री?
सध्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारमध्ये रुसव्या-फुगव्याचं वातावरण तयार केलं जात आहे, पण तसं काही नाही. माझा माझ्या सहका-यांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सर्वजण अनेक संकटांवर मात करत राज्याच्या भल्यासाठी उत्तमरित्या काम करत आहोत. त्यामुळे सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, आम्ही सगळे एक आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
गृहखाते सेनेने घेण्याची मागणी
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात पुरावे दिले, तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे सांगत गृह खात्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वत:कडे घ्यावे, असा सल्ला ज्येष्ठ शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री पद स्वत:कडे ठेवले होते, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील गृहखाते स्वत:कडे घ्यावे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले होते.
(हेही वाचाः संजय राऊत यांच्यावर राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी?)
Join Our WhatsApp Community