भाजपच्या एका टिनपाट प्रवक्त्यामुळे भारतावर नामुष्की ओढवली आहे. या प्रवक्त्याने प्रेषितांच्या अवमान केला, त्यामुळे मुस्लिम राष्ट्रे संतापली आहेत. तिथे पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीला लावला जात आहे, देशाला माफी मागायला लावली जात आहे. याचा भारताशी काय संबंध, भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे भारताची जगात नामुष्की होत आहे, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केला.
भाजप इतर धर्मियांचा अवमान करत आहे
औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. भाजपचे प्रवक्ते सध्या वेगळ्याच मुद्द्यांवर बोलत आहेत. त्यांना पैगंबर यांच्यावर बोलायची काय गरज होती? जसे आपले देव-देवता आपल्यासाठी प्रिय, तसे त्यांचे देव हे त्यांना प्रिय. कोणत्याही धर्माचा तिरस्कार का करायचा. पण भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांनी पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आणि भारताची नामुष्की झाली. पश्चिम आशियामध्ये आज भारताचा निषेध केला जात असून तिकडच्या कचराकुंडीवर पंतप्रधानांचा फोटो लावला जात आहे. भाजपच्या प्रवक्त्यांमुळे भारतावर आज नामुष्की ओढावली. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाहीत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. त्यामुळे कुठे नेऊन ठेवणार आहात माझा हिंदुस्थान, असा सवाल भाजपला विचारायला हवा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही व्यासपीठावरून मुसलमानांना मारा, झोडा, असे म्हटले नाही. शिवसेनाप्रमुख कायम तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा, असे म्हणायचे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचे उल्लू बनाविंग! )
मित्र होते ते हाडवैरी झाले
अडीच वर्षे झाल्यानंतरही हे सरकार कोसळत नाही, त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली 25 वर्षे जे मांडीवर बसले होते, ते आता उरावर बसले आहेत. तर ज्यांच्याशी 25 वर्षे लढलो, त्यांनी मानसन्मान दिला. आता रोज सरकार पडण्याची हे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळेच मी परत येणार अशी वक्तव्य केली जातात. भाजप सुपारी देऊन भोंगा वाजवते, हनुमान चालीसा पठण करुन घेते.
एका व्यासपीठावर या आणि हिंदुत्वावर कोणी काय केले ते सांगूया
मैदान पुरत नाही इतकी गर्दी सभेला वाढत आहे, ढेकणे चिरडायला तोफेची गरज नाही, ढेकणे आम्ही अशीच चिरडत असतात. हिंदुत्व आपला श्वास आहे हे शिवसेनाप्रमुखांनी या मैदानातच सांगितले होते. रुपया खाली घसरत आहे, पण आम्हाला चिंता कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे, आमचे हिंदुत्व मोजण्याची मोजपट्टी तुम्हाला कुणी दिली? एकदा भाजप आणि शिवसेना यांनी एका व्यासपीठात यावे आणि हिंदुत्वावर कुणी काय केले हे सांगूया. फडणवीस म्हणतात शिवसैनिक बाबरी पडायला गेले नव्हते मी सांगतो औरंगाबाद येथे मोरेश्वर शिवसेनेचे महापौर बाबरी पडायला गेले होते, खरे खोटे त्यांनी मोरेश्वर यांच्या मुलाला विचारावे जो आज भाजपमध्ये आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी बाबरी पडल्याची जबाबदारी घेतली नसती, अमरनाथ यात्रेवर गंडांतर आले तेव्हा शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते, काश्मिरी पंडितांच्या बाजूने बोलले नसते तर हिंदुत्वाच्या जोरावर तुम्ही दिल्लीत सत्ता काबीज केली नसती. काश्मिरात दहशतवादी गोळ्या झाडात आहेत, तिथे जाऊन हनुमान चालीसा म्हणा, हिंमत असेल तर तिकडे जा.
Join Our WhatsApp Community