एचएन रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. 10 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. आज 22 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते वर्षावर परतणार आहेत. गुरुवारी केलेल्या तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना हा डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले.
…म्हणून करण्यात आली शस्त्रक्रिया
गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यावरून वरिष्ठ डॉक्टर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यावेळी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्यात आला होता. मात्र ही सर्व्हायकल आणि स्पायनल कॉड शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
(हेही वाचा – ‘विकास’ कामांचा भार मुख्यमंत्र्यांच्या मानेवर, म्हणाले…)
रूग्णालयातून प्रकृतीसंदर्भात एक निवेदन
रुग्णालयात असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.
Join Our WhatsApp Community