1 मे रोजी औरंगाबाद येथे होणा-या राज ठाकरे यांच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. असे असताना आता महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी त्यांनी विरोधकांना इशारा देखील दिला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कोणी करत असेल तर त्यांना राज्यातील स्वाभिमानी जनता उत्तर देण्यास समर्थ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः मग कुणाची नावं घ्यायची, पवारांचा राज ठाकरेंना सवाल)
विरोधकांना इशारा
कितीही संकटे आली तरी महाराष्ट्राची घोडदौड ही कायम सुरुच राहील. संपूर्ण देशाला स्फूर्ती देणारा हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे इतकी महान संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान कोणी करत असेल तर त्यांना जनता योग्य ते उत्तर देईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.
(हेही वाचाः राज ठाकरे रस्ता चुकले, आणि…)
महाराष्ट्राने धीराने तोंड दिले
राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. कोरोनाच्या कठीण काळात देखील महाराष्ट्राने सर्व स्तरांतील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला. संकट काळातच खरी परीक्षा असते, त्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षांत आलेल्या नैसर्गिक संकटांना आणि कोरोनाच्या संकटाला महाराष्ट्राने धीराने तोंड दिले. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडा उचलून सर्वांचे मनोधैर्य खच्ची करणा-यांचे प्रयत्न फिके पडल्याचे दिसते, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
Join Our WhatsApp Community