शिवसेनेने आपला झेंडा आणि विचार कधीही बदलले नाहीत, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

149

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर सध्या शिवसेना-मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध जुंपले आहे. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्याची चर्चा असतानाच आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. शिवसेनेने आपल्या स्थापनेपासून कधीही आपला झेंडा आणि विचार बदलले नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे बोलले जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात मांडलेल्या भूमिकेचे भाजपकडून समर्थन करण्यात येत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ज्यांना भगव्याची अॅलर्जी आहे त्यांच्या मागे शिवसेना लागल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या मनसेवर देखील निशाणा साधला.

(हेही वाचाः ‘शिवतीर्था’वरील ‘बाळ’ ठाकरेंना तुम्ही पाहिले का?)

काय म्हणाले मुख्यमंत्री?

शिवसेना 1966 साली जन्माला आली. तेव्हापासून शिवसेनेने आपला झेंडा, रंग, विचार आणि नेता कधीही बदलला नाही. आजही आमच्या मनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच आहेत, दुसरा कोणताही नेता आमच्या मनात किंवा इतर कुठेही नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या मनसेवर निशाणा साधला.

मनसेचा नवा झेंडा

मनसेने 23 जानेवारी 2020 रोजी राज्यव्यापी अधिवेशनात आपल्या पक्षाचा नवा झेंडा सर्वांसमोर आणला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवमुद्रा असलेल्या या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे यापुढे रेटता येणार नाही, हीच गोष्ट लक्षात घेऊन आता मनसेने नव्याने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला असल्याचे मत त्यावेळी राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या भेटीनंतर मी…, वसंत मोरेंची प्रतिक्रिया)

मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

भगव्याला साथ देण्यासाठी ज्यांनी भगव्याचं नाव घ्यायला हवं, ते आता भगव्याची अॅलर्जी असलेल्यांच्या मागे लागल्याची टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. छत्रपती शिवरायांचा भगवा हा खरा भगवा आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्या शेजारी तुम्ही हिरवा, निळा, पिवळा आणि काळा झेंडा लावाल, तर तो भगवा आम्हाला मान्य नाही. तुमचा भगवा हा खरा नाही, अस्सल भगवा हा छत्रपती शिवरायांचा, साधू संतांचा आणि वारक-यांचा आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.