तुम्ही वर्षावर या! मुख्यमंत्र्यांचे अपक्ष आमदारांना निमंत्रण

117

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीने दिलेली ऑफर भाजपने नाकारल्यामुळे आता राज्यसभेचा रणसंग्राम होणे अटळ आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे स्पष्ट असून, अपक्ष उमेदवारांच्या हातात सहाव्या जागेचं भवितव्य आहे. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी आता शिवसेनेकडून हालचालींना वेग आला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी सर्व अपक्ष आमदारांना वर्षा बंगल्यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून निमंत्रण

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात जंगी सामना रंगणार आहे. त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीत अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. या निवडणुकीत मविआला पाठिंबा देण्यासाठी आता अपक्ष आमदारांना वर्षा बंगल्यावर येण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे यावेळी अपक्ष आमदारांसोबत मोठी खलबतं होणार असल्याची चर्चा आहे.

(हेही वाचाः राज्यसभेचा रणसंग्राम होणारच! मविआची ऑफर भाजपने धुडकावली)

शिवसेनेकडून हालचालींना वेग

तसेच शिवसेनेच्या आमदारांना 8 ते 10 जून दरम्यान मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा दगाफटका झाला तर त्याची मोठी किंमत महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला चुकवावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ही पावले उचलण्यात येत असल्याची चर्चा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.