राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री काही आठवड्यांपासून वर्क फ्रॉम होम करताना दिसताय. सध्या ते राज्याचा कारभार, महत्वाच्या आढावा बैठकींना ऑनलाईन माध्यमातूनच घरुनच उपस्थिती लावतायत. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्षात कोणताच सहभाग दर्शवत नसल्याने मुख्यमंत्री हे पद किंवा संपूर्ण पदभार कोण सांभाळणार, अशा चर्चांना मध्यंतरी उधाण आलं होतं. इतकंच काय तर विरोधकांसह जनतेने देखील हे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंची पत्नी रशमी ठाकरे किंवा त्यांचा मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना तरी द्या असा सल्ला दिला होता. तर राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात हा मुद्दा चांगलाच गजला होता. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे. मात्र या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थितीत राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
एका बैठकीपूरतं टोपे मुख्यमंत्री
आरोग्याच्या कारणास्तव हजर राहाता येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आलं आहे. मात्र असे असले तरी आज 4.30 वाजता पंतप्रधान मोदी कोविडसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. आजच्या या बैठकीला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे एका बैठकीपूरतं का होईना अखेर राजेश टोपेंना Accidental CM बनण्याची संधी मिळाली आहे.
(हेही वाचा – सर्वच औषध पुरवठादारांनी हाफकिनला काळ्या यादीत टाकले, वाचा काय आहे कारण)
सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी टोपेंना मान
आज दुपारी पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संचद साधणार आहेत. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीमध्ये पुन्हा देशभरात लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीत महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राजेश टोपे सहभागी होणार असून त्यांची जबाबदारी सांभाळण्याचा मान देण्यात येणार असून टोपे कोरोनाच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा मांडणार आहेत.