पुरामुळे कोकण आणि विशेषत: चिपळूणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिपळूण शहरात तर व्यापाऱ्यांचे पुरते नुकसान झाले असून, जगायचे कसे असा प्रश्न आता व्यापाऱ्यांना पडू लागला आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले आणि ते फक्त आश्वासनच देऊन गेल्याचे पहायला मिळाले. ठोस मदतीची अपेक्षा असताना सर्वांना तातडीने मदत केली जाईल, एवढेच आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्यापा-यांना कर्जमाफी द्या
एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर सर्व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. पूर आला, त्यात आमचे मोठे नुकसान झाले. आमच्यावर कर्ज आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. व्यापाऱ्यांना आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. त्यानंतर आम्हाला दोन टक्क्याने कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीही भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला जगवा, असा टाहोच एका व्यापाऱ्याने फोडला. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचाः काहीही करा, पण मदत करा… मुख्यमंत्र्यांसमोर महिलेने फोडला टाहो)
कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही
या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुरामुळे ज्यांचे शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. माझ्याकडे दोन दिवसांत अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल, असे सांगतानाच लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं देखील ते म्हणाले.
नक्कीच मदत दिली जाईल
सरकार म्हणून जे काही करणे आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
(हेही वाचाः तळीये दुर्घटनाग्रस्तांना पक्की घरे बांधून देणार! नारायण राणेंची मोठी घोषणा)
Join Our WhatsApp Community