मी पॅकेज देणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री!

या आपत्तीवर मी कोणतीही वेडीवाकडी घोषणा करणार नाही, तसेच वेडीवाकडी मदतही केंद्राकडे मागणार नाही, मी संपूर्ण आढावा घेऊनच केंद्राकडे योग्य ती मदत मागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सवंग लोकप्रसिद्धीसाठी मी कोणतीही घोषणा करणार नाही. अजूनही चिपळूण, कोल्हापूर, सांगली या भागात पुराचे पाणी  ओसरले नाही, त्यामुळे नुकसानीचा अंदाज आलेला नाही. जोवर नुकसानीचा संपूर्ण आढावा घेतला जाणार नाही, तोवर आपण कोणतीही घोषणा करणार नाही. मी पॅकेज देणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना सांगितले.

आढावा घेऊन केंद्राकडे मदत मागणार! 

३० जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी चर्चा केली. केंद्राला आपण पत्र लिहिले आहे, त्यामध्ये एनडीआरएफचे नियम बदलण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. हे नियम २०१५ चे आहेत. त्यात आता बदल करण्याची गरज आहे. त्यातच कोविडचे संकट आले आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी ढासळली आहे. या आपत्तीवर मी कोणतीही वेडीवाकडी घोषणा करणार नाही, तसेच वेडीवाकडी मदतही केंद्राकडे मागणार नाही, मी संपूर्ण आढावा घेऊनच केंद्राकडे योग्य ती मदत मागणार आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा : शिल्पा शेट्टी भडकली! गुगल, ट्विटर, फेसबुकवर कडाडली!)

महसूल विभागाचा पंचनामा ग्राह्य धरण्याची केंद्राकडे मागणी!  

नैसर्गिक आपत्तीमुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे, त्या पुन्हा उभारणे हे आव्हान आहे, त्यासाठी निधी लागणार आहे. निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये विमा कंपन्यांना ५० टक्के रक्कम देण्याचे निर्देश देण्याची सूचना केली आहे. तसेच बँकांना कमी व्याज दरात व्यापाऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देण्याची विनंती केली असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. पूरग्रस्त भागाची पाहणी करून महसूल विभाग पंचनामा करणार आहे. केंद्रानेही हाच पंचनामा ग्राह्य धरून मदत द्यावी, त्यामध्ये आडकाठी आणू नये, अशीही मागणी आपण अर्थमंत्री सीतारामन यांना केली असल्याचे म्हटले आहे.पाहणी दौरा करताना आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यामध्ये या अशा नैसर्गिक आपत्तींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी भाजपनेही सरकारसोबत यावे, माझ्याकडे तीन पक्ष आहेतच त्यात चौथा पक्ष येईल, अशा प्रकारे प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील तर तो एकमताने घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत राहणार, अशा वेळी पुराच्या पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करता येऊ शकते का अथवा ते पाणी सुखरूपपणे कसे वाहून जाईल, हे पाहिले जाईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here