लवकरच महाविकास आघाडी कोसळून राज्यात शिवसेना भाजपचे सरकार येईल अशी चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र भन्नाट उत्तर दिले आहे. ‘बाळासाहेब आणि अजित पवार यांच्यामध्ये बसलो आहे. सांगा आता यांना सोडून कुठे जाणार?’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेला फेटाळून लावले आहे.
आता काय घडणार?
तीस वर्षांची युती असताना काही घडले नाही. तर आता काय घडणार, असे सांगत युतीच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे उत्तर दिले.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
सोमवारी सभागृहात आणि अध्यक्षांच्या दालनात जे घडलं ते राज्याची मान शरमेने खाली घालणारं आहे. जबाबदार पक्षाकडून हा प्रकार घडला हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. तसेच अधिवेशनातील वागणुकीचा दर्जा खालावत चालला आहे. वेडंवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा ही लोकशाहीची लक्षणे नाहीत. सभागृहात विरोधकांनी दिलेल्या घोषणा लांछनास्पद होत्या. सभागृहात सध्या लोकप्रतिनिधींनाच धमक्या दिल्या जातात. भास्कर जाधवांसोबत दालनात काय घडलं ते समोर आलं नाही, त्यांच्यासोबत अनेक गोष्टी घडल्या. अधिवेशनात असं घडणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
(हेही वाचाः आमदारांच्या निलंबन प्रकरणी भाजप उच्च न्यायालयात जाणार!)
विरोधकांनी चूक सुधारावी
त्याचबरोबर विरोधकांकडून खालच्या पातळीचं राजकारण केलं जात आहे. विरोधी पक्षाने जरी कितीही राजकारण केलं तरी आम्ही राज्याच्या जनतेच्या जीवाशी खेळ करणार नाही. माझ्या पहिल्याच टर्ममध्ये मला हा अनुभव आला, या गोष्टीचं वाईट वाटतं. विरोधकांनी आपली चूक सुधारावी, अशी समज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिली आहे.
अध्यक्षांची निवडणूक कधी होणार?
सध्या कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे अधिवेशन जास्त कालावधीसाठी घेणे हे धोक्याचे होते. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातही पार पाडता आली नाही. पण लवकरच सगळी खबरदारी घेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
(हेही वाचाः विधानसभेत भास्कर जाधवांचे ‘माझी बॅट, माझी बॅटिंग’)
तर दिवस-रात्र लसीकरण करू
बोगस लसीकरण हा जीवघेणा प्रकार आहे. लसींचा पुरवठा वेळच्या वेळी झाला तर महाराष्ट्रात दिवस-रात्र लसीकरण सुरू करू, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लसीकरणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. महाराष्ट्रात लसींचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरणाला हवी तशी गती मिळत नाही, त्यामुळे केंद्राकडून जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करण्यात यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याला दर महिन्याला तीन कोटी लसींचा पुरवठा केंद्राने करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
तर केंद्र घोटाळा करतं, असं म्हणायचं का?
विरोधकांनीही सत्तेत असताना इम्पिरिकल डेटा मागितला होता. त्याचप्रमाणे जर आम्ही केंद्राकडे इम्पिरिकल डेटा मागितला तर त्यात चूक काय? जर केंद्राच्या माहितीत चुका आहेत, तर केंद्र घोटाळा करतं, असं म्हणायचं का?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावेळी विरोधकांनी आकांडतांडव केला. मराठा आरक्षणाच्या ठरावाच्यावेळी भाजप सभागृहात नव्हते. त्यामुळे या सगळ्यातून विरोधकांना नेमकं साधायचं काय आहे, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.
(हेही वाचाः विधानसभेच्या आवारात भाजपने स्थापन केली दुसरी विधानसभा! अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही राडा)
Join Our WhatsApp Community