आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. त्यानंतर शुक्रवारी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं. त्यावेळी त्यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. राणा दाम्पत्याला अडवण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्रीच्या बाहेर जागता पहारा दिला. पण जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीवर आगमन झाले तेव्हा त्यांनी सर्व शिवसैनिकांना घरी जाण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन
राणा दाम्पत्याविरुद्ध शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबईत जोरदार निदर्शने केली. मातोश्रीवर येऊन दाखवा तुम्हाला महाप्रसाद मिळेल, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून यावेळी करण्यात आली. सकाळपासून असंख्य शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले होते. संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर या सर्व शिवसैनिकांची भेट घेतली.
तेव्हा इथे येण्याची कोणाची हिंमत नाही, तुम्ही सकाळपासून आला आहात, तुम्ही आपापल्या घरी जा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. तर तुम्हाला काही होणार नाही, आम्ही आहोत तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, अशी विनंती यावेळी शिवसैनिकांनी आपले पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
(हेही वाचाः मुंबईत राणा दाम्पत्य आक्रमक, अमरावतीतील शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे अस्तित्व धोक्यात)
राणा दाम्पत्याचं आव्हान
सध्या महाराष्ट्रावर अनेक संकटे आली आहेत. ती संकटे दूर करण्यासाठी आम्ही राणा दाम्पत्य २३ एप्रिल रोजी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचणार आहोत. यासाठी पोलिसांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू. शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमानाच्या नामस्मरणात दम आहे, हे आम्हाला पहायचे आहे. कुणी जर देवाचे नाव घेण्यासाठी मुर्दाबाद होत असतील, तर रवी राणा आणि नवनीत राणा मुर्दाबाद होण्यासाठी तयार आहेत, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना दिले आहे.
(हेही वाचाः आम्हाला बघायचेच…शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमानाच्या नामस्मरणात! नवनीत राणांचे आव्हान)
Join Our WhatsApp Community