मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात पण… अखेर मुख्यमंत्र्यांनी मनातलं सांगितलंच

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असून, या ना त्या कारणावरुन या तिन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत गेल्याने शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. मात्र आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धक्कादायक विधान केले असून, राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे जे मुख्यमंत्र्यांच्या पोटात आहे तेच त्यांच्या ओठावर आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात आहे. मात्र त्याचा असा अर्थ असा नाही की मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन. ते चुकीचे ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी असा कधीच विचार केला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. माझी कारकीर्द सर्वांसमोर आहे. विरोधकांनी जे केलं ते सर्वच वाईट अशी माझी भूमिका कधीही नव्हती. या काळात अनेक शोध लागत आहेत, पण पाण्याचा शोध नाही लागला. जे पाणी आहे त्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिलं पाहिजे. 25 वर्षांनंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिलं पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना दिला.

(हेही वाचाः तुमचं ठरलं असेल तर आम्हालाही सांगा, आम्हीही तयारीला लागतो! पवारांनी व्यक्त केली नानांवरची नाराजी)

स्वबळावरुन काँग्रेसला झोडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी काँग्रेसला स्वबळावरुन चांगलेच फटकारले. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी आघाडीचे मंत्री उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणात जेवणाचा विषय काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या भाषणातील जेवणाचा धागा पकडून जोरदार बॅटिंग केली. दादा तुम्ही जेवणाचा विषय काढला, थोरात साहेब म्हणाले कोरोनामुळे जमले नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेऊ, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच सारवासारव केली. स्वबळाचा अर्थ असा नका समजू, म्हणजे आम्ही न भिता जेवायला येऊ. नाही तर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असे काही छापून यायचे, असे काही नाही. हा गंमतीचा भाग आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचाः वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here