मुख्यमंत्री म्हणाले अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी

कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आले पाहिजे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

दिवाळी आल्यानंतर मला माझे बालपण आठवते. मातीने अंगण सारवून त्यावर ठिपक्यांची रांगोळी काढायची, त्याचप्राणे अर्थसंकल्प ही देखील एक ठिपक्यांची रांगोळीच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सोमवारी राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. सभापती आणि उपसभापती यांना थोडे गुरुजींसारखे वागावे लागेल. मी विधान परिषदेचा, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य. मला दिवाळीतील ठिपक्यांची रांगोळी आठवते, ठिपके जोडले की एक परिपूर्ण रांगोळी होते. तसेच सर्व मतदारसंघ जोडून राज्य उभे राहते, असे देखील ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय-प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत मंगळवार, ५ ऑक्टोबर तसेच बुधवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प: माझ्या मतदार संघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त केले.

(हेही वाचाः एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची ‘या’ महिन्याचीही तारीख हुकणार! )

हल्ली उथळपणा अधिक

पावसाची सुरुवात आपल्याकडे चक्रीवादळाने होते, प्रत्येकवेळी पंचनामे होतात. नुकसानभरपाई कशी होते? तात्काळ मदत करावी लागते. मी खोटे बोलणार नाही, लोकांना धीर देताना उगीच काहीही बोलायचे नसते. माझ्यावर टीका झाली तरी चालेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही सभागृहात जे बोलता ते केले नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचे तुम्हाला भान असले पाहिजे. पण आता उथळपणा अधिक असतो. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आले पाहिजे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

मृणाल गोरेंची सांगितली आठवण

सभागृहातील आपली वागणूक, संसदीय भाषा याचाही विचार व्हायला हवा असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृणाल गोरेंचे उदाहरण आठवत असल्याचे सांगितले. सत्तेच्या मोहापायी मी दुसर्‍या पक्षात जाणार नाही अशी ठाम भूमिका त्या मांडायच्या, असे त्यांनी सांगितले. त्या विरोधी पक्षनेत्या होत्या एखादी माहिती आली की त्या खातरजमा करायच्या आणि नंतर सभागृहात मुद्दा मांडायच्या.

(हेही वाचाः ‘त्या’ रेव्ह पार्टीतून महाविकास आघाडीतील बड्या नेत्याचा मुलगा पळाला! )

विरोधकांना दिल्या कानपिचक्या

अर्थसंकल्प मांडताना शेरोशायरी, संतवचने आली पाहिजेत का? अर्थसंकल्प समजून त्यावर नेमकेपणाने बोलणे हे कठीण असते. अर्थसंकल्प मांडला आहे, माझ्या मतदारसंघासाठी त्यात काय आहे, हे समजून त्या दिशेने पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे काम असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. सभागृहात आपण बोलावं कसं हे आपण शिकलं पाहिजे. अर्थसंकल्पाच्या भाषणात शेरोशायरी करायची, संतवचने सांगायची आणि विरोधात वागायचे. मी फडणवीस यांच्याशीही बोललो. सभागृहात किती हमरीतुमरी करायची, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here