20 जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभे निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार यात काही शंका नाही. पण राज्यसभा निवडणुकीत कोण फुटलं हे आम्हाला कळलं आहे, त्याचा उलगडा हळूहळू होईलच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
(हेही वाचाः विधानसभेने ठरवले तर राज्यातील विधान परिषदच रद्द होऊ शकते, कशी? वाचा)
कोणी कलाका-या केल्या ते कळलं आहे
विधान परिषदेच्या निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येणार यात काहीच शंका नाही. पण राज्यसभेच्या निवडणुकीत जे झाले त्याचा अंदाज बांधून झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटलेले नाही, पण कोण फुटलं, कोणी काय काय कलाका-या केल्या आहेत, ते सुद्धा कळलेले आहे, हळूहळू त्याचा उलगडा झाला आहे. पण शिवसेनेत कोणीही गद्दार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे.
20 जून रोजी निवडणूक
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर सोमवारी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
(हेही वाचाः विधान परिषदेचीही रणधुमाळी होणारच, अर्ज मागे घेण्याची मुदत संपली)
कोणाकडून कोणाला उमेदवारी?
महाविकास आघाडी
शिवसेना-2
सचिन अहिर
आमशआ पाडवी
राष्ट्रवादी काँग्रेस-2
रामराजे निंबाळकर
एकनाथ खडसे
काँग्रेस-2
भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे
भाजप-5
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
राम शिंदे
उमा खापरे
श्रीकांत भारतीय