मानेच्या शस्त्रक्रियेसाठी सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल आहेत. ते अजूनही रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यानंतरही त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरही परिणाम होणार आहे. हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होण्याची दाट शक्यता आहे.
१२ दिवस मुख्यमंत्री रुग्णालयात
मानदुखीचा त्रास वाढल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना १० नोव्हेंबर रोजी रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शुक्रवारी, १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र शस्त्रक्रिया होऊनही १० दिवस उलटले तरी मुख्यमंत्री हे रुग्णालयातच आहेत, याला स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच ते अजून पुढील ३ दिवस रुग्णालयातच असतील, त्यानंतरही त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती करावी लागेल, आपण स्वतः त्यांच्याशी फोनवर बोललो आहे, असे राऊत म्हणाले.
(हेही वाचा आनंदाची बातमी! गायी पाळा, फुकट वीज मिळवा!)
मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम रद्द
त्यामुळे याचा परिणाम आता हिवाळी अधिवेशनावर होण्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर होत असते, पण मुख्यमंत्र्यांसाठी हे अधिवेशन मुंबईत घेण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांची उपस्थिती नियोजित आहे. मात्र आता मुख्यमंत्री ठाकरे याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
Join Our WhatsApp Community