राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

आंदोलन करायचे तर ते कोरोनाविरुद्ध करा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले.

134

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी विरोधक आक्रमक असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना? याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्हीही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर ते कोरोनाविरुद्ध करा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांचा असाही दानशुरपणा…जाणून घ्या)

…तर संकटातून बाहेर पडू शकणार नाही

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बालत होते. मला थोडंसं आश्चर्य वाटतं आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असे आहे, ते तसे आहे असे काही लोक म्हणत आहेत. पण मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा, संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जात आहोत. मग अशावेळी घाई केली तर आपण आणखी काही वर्षे, काही महिने या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचाः तिस-या लाटेला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन)

मग कोरोना कधीच जाणार नाही

शिक्षणदिनी कोरोनाने आपल्याला जे धडे शिकवले त्यातून आपण काय शिकलो याचा विचार करुन या संकटाचा बिमोड करायचा आहे. प्रत्येक पाऊल सावधानतेने आणि काळजीपूर्वक आपण टाकत आहोत. ती घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधी बाहेरच पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.