आषाढीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक दाखल झाले. पावसाळी वातावरण असल्याने विमानाने त्यांना जाणे शक्य झाले नाही, म्हणून ते रस्त्याने निघाले, ८ तास स्वतः गाडी चालवून ते विठुरायाच्या चरणी पोहचले. लांबचा प्रवास करूनही मुख्यमंत्र्यांनी विश्रांती न घेता शासकीय विश्रामगृह येथे पोहचताच, बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
(हेही वाचा : फेरबदलाच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी! भाजपचे मात्र नाराजांवर लक्ष!)
कोरोना स्थितीचा घेतला आढावा!
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा, कोविड झालेल्या रूग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करा. म्युकरमायकोसिसबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Join Our WhatsApp Community