मुख्यमंत्री ‘कोण’? उद्धव ठाकरेंनाच पडला प्रश्न

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच आता प्रश्न पडू लागलाय की, राज्याचा मुख्यमंत्री नेमका आहे तरी कोण?

83

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न कुणालाही विचारला तर कुणीही सहज उत्तर देईल मा. उद्धव ठाकरे… आता तुम्ही म्हणाल, हा काय विचारण्यासारखा प्रश्न आहे का? शाळेत जाणाऱ्या पोराला जरी विचारलं, तरी तो एका झटक्यात याचं उत्तर देईल. पण हा प्रश्न विचारण्यामागचे कारणही तसेच आहे. ते म्हणजे राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या विसंवादामुळे, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच आता प्रश्न पडू लागलाय की, राज्याचा मुख्यमंत्री नेमका आहे तरी कोण?

वडेट्टीवारांचा गोंधळ, मुख्यमंत्र्यांची चिडचीड

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल राज्यातील १८ जिल्हे अनलॉक करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत जाहीर केली. पण बैठकीत जी चर्चा झाली ती सध्या तरी सांगू नका. सविस्तर माहिती घेऊनच हा निर्णय जाहीर करू, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच सर्वांना दिली होती. मात्र तरी देखील विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांच्या आग्रहास्तव जी माहिती माध्यमांना द्यायची नव्हती, ती देखील अति उत्साहात देऊन टाकली. वडेट्टीवार यांनी माहिती देताच उद्यापासून राज्यातील १८ जिल्हे अनलॉक होणार, अशा बातम्या सगळीकडे पसरल्या.

(हेही वाचाः अंतिम निर्णयाआधीच काँग्रेसने जाहीर केले अनलॉक! ठाकरे सरकारमध्ये पुन्हा विसंवाद!)

त्यानंतर लागलीच मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोरोनाचा संसर्ग अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रुप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे, याविषयी निश्चित करावे लागेल. त्यामुळे अजून राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड चिडले असून, मुख्यमंत्री नेमकं कोण तुम्ही की मी? असा जाब त्यांनी वडेट्टीवारांना विचारल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांचा हा उद्रेक बघता विजय वडेट्टीवार यांनी लागलीच आपल्या वक्तव्यापासून यु-टर्न घेतला.

(हेही वाचाः उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला कंटाळले?)

मुख्यमंत्र्यांच्या दट्ट्यानंतर वडेट्टीवारांचा घुमजाव

राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत अनलॉकच्या 5 लेव्हलना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एचडीएमएने पाच लेव्हल ठरवल्या, त्याला मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊन लादणे हे सरकारचं काम किंवा जबाबदारी नाही. ज्या भागातील जनतेने सहकार्य केले, त्या भागातील लॉकडाऊन कमी करायचा, हे धोरण ठरवले. ऑक्सिजन बेड, पॉझिटिव्हिटी रेट यावरुन पाच स्टेप ठरवल्या, टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचे असे ठरले असून, त्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र अंतिम आदेश मुख्यमंत्री घेतील, असा घुमजाव वडेट्टीवार यांनी केला.

(हेही वाचाः वाचाळवीर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची समज! मंत्रिमंडळात लसीकरणाच्या श्रेयवादाचा मुद्दा गाजला?)

वाचळवीरांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले हात

ठाकरे सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांना समज देण्याची मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे होणाऱ्या वादांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवावा, अशा कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना फटकारले होते. विनाकारण सार्वजनिक वादग्रस्त विधाने टाळा. ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाहीत, अशी वक्तव्य करू नका. अशा कडक सूचना सरकारमधील नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. मात्र तरी देखील विजय वडेट्टीवार यांच्या एका गोंधळामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच या वाचाळवीरांसमोर हात टेकले आहेत.

(हेही वाचाः ‘हे’ आहेत ठाकरे सरकारमधील वाचाळवीर, आता आरोग्यमंत्रीही बरळले!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.