पुरामुळे चिपळूणमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, व्यापाऱ्यांचे पुरते नुकसान झाले आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पहाणी केली. यावेळी एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेले. होते नव्हते, ते सर्व गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असे म्हणत एका महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो फोडला.
मुख्यमंत्र्यांसमोर गा-हाणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांची भेट घेतली, त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी काही व्यापाऱ्यांनी आमचं मोठं नुकसान झालं, आमचा माल भिजला, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. काही नागरिकांनी तर मुख्यमंत्र्यांसमोरच ठिय्या मांडला होता. शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांना देखील कर्जमाफी द्या, अशी देखील यावेळी काही स्थानिक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. नंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी पुढे रवाना झाले.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1419214021014691842?s=20
(हेही वाचाः तळीये दुर्घटनाग्रस्तांना पक्की घरे बांधून देणार! नारायण राणेंची मोठी घोषणा)
काळजी करू नका- मुख्यमंत्री
तुमचे जे नुकसान झाले आहे, त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पाणी अचानक कसे भरले, पूर का आला?, याचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. पूर तुम्हाला काही नवीन नाही, हे मला कुणीतरी सांगितले. यंदा पूर मोठ्या प्रमाणावर आला. कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यामुळे या पुराचे जलव्यवस्थापन करावे लागेल. तुमच्याकडे पूर येऊच नये, असं व्यवस्थापन करावं लागेल. पण त्याला थोडा अवधी लागेल, असे देखील त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः पुन्हा एकदा कोल्हापूरच्या मदतीला धावली मुंबई महापालिका)
Join Our WhatsApp Community