काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मुख्यमंत्र्यांची करडी नजर

आता मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या निर्णयात विशेष लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकताच लेटरबॉम्ब फोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या या आरोपांची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, आता मुख्यमंत्री स्वत: काँग्रेसच्या मंत्र्यांवर करडी नजर ठेवणार आहेत. काँग्रेसचे मंत्री कोणते निर्णय घेतात, काय करतात यावर आता मुख्यमंत्री अधिकाऱ्यांमार्फत करडी नजर ठेवणार आहेत. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाला चाप लावत काही निर्णय बदलले होते. आता तशीच कृती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.

शिवसेना आमदारांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष

महाविकास आघाडीत सत्तेत असूनही शिवसेना आमदारांना न्याय मिळत नाही. उलट काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या आमदारांची कामे करतात, अशी ओरड सध्या शिवसेनेच्या आमदारांची आहे. एवढेच नाही तर प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात तशी खंत देखील बोलून दाखवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत, अशी आपल्या पक्षातील आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी आहे. या गोष्टीची खंत वाटत असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत शिवसेनेला कमकुवत करत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत आपण भाजपशी जुळवून घेतलेले बरे, असे देखील प्रताप सरनाईक म्हणाले होते. त्याचमुळे आता मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या निर्णयात विशेष लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांची विदेशात बेकायदेशीर संपत्ती; ‘हा’ आमदार करणार ईडीकडे तक्रार)

आव्हाडांच्या निर्णयाला लावला ब्रेक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतात. त्याचमुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यापुढे मंत्र्यांनी घेतलेले निर्णय हे सर्वांना विश्वासात घेऊन घेतले का? जर निर्णय तसे घेतले नसतील, तर त्या निर्णयांना चाप लावण्याचे काम आता स्वत: मुख्यमंत्री करणार आहेत. याचीच प्रचिती मंगळवारी पहायला मिळाली. टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता. मात्र, या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहेत. स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या, असे मला सांगितले. 15 मिनिटांत निर्णय झाला, बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

(हेही वाचाः आता आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती)

या आधीही काँग्रेस मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप

दरम्यान याधाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांच्या खात्यात हस्तक्षेप केला होता. व्यवस्थापन विभागात मुख्यमंत्र्यांनी विश्वासात न घेता केलेला हस्तक्षेप या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना आवडला नाही. याबाबत त्यांनी खासगीत नाराजीही व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिला आणि आणि बाल विकास खात्याशी संबंधित असलेली काही माहिती राज्याच्या विभागीय आयुक्तांकडून मागितली होती. या खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही. मात्र, काँग्रेस पक्षाने या प्रकाराची दखल घेतली आहे.

(हेही वाचाः अखेर महाविकास आघाडीचे ठरले! नाराजी दूर करण्यासाठी हा काढला मार्ग!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here