राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधल्यानंतर गुरूवारी मंत्रालयातील सर्व विभागाच्या सचिवांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद मुख्यमंत्री ऑनलाईन साधणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रालयातील विभागांच्या सचिवांसह ही बैठक घेणार असून अडीच वर्षांत केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री सचिवांचे आभार मानणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील सर्व सचिवांची बैठक बोलावली असल्याने अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांची ही बैठक शेवटची तर नाही ना? मुख्यमंत्री गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यादरम्यान राजीनामा देणार का? मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमकं काय सुरू असेल? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे.
(हेही वाचा – “आमच्या विठ्ठलाला…”, राज ठाकरेंप्रमाणेच शिंदे गटाचाही ‘बडव्यां’वर रोष)
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ४० हून अधिक आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला आहे. अशातच शिंदेनी त्यांच्यांसोबत ४६ आमदारअसल्याचा दावा देखील केला आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना प्रत्यक्षात चर्चा करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली. त्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती कमी होताना दिसत नसल्याने शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.