NCP : जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये ‘कोल्ड वॉर’; एकमेकांना सुनावले

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ६ जून रोजी एक्सवर एक पोस्ट टाकून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती.

163

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या (NCP) शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्व पक्षांच्या तुलनेत चांगला निघाला. मात्र त्याच वेळी आता या पक्षात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या यशाचे धनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असल्याचे त्यांचे समर्थक म्हणू लागताच आमदार रोहित पवारांनी जाहीरपणे हा दावा खोडून काढला, यावर जयंत पाटील यांनीही जाहीरपणे त्याचा प्रतिवाद केला. अशा प्रकारे या पक्षात या दोन नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झाले आहे.

श्रेयवादाची लढाई सुरु 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी अधिक उजवी ठरली. पक्षाने १० पैकी ८ जागा जिंकत इतर पक्षांपेक्षा चांगला स्ट्राईक रेट असल्याचे दाखवून दिले. ४ जूनच्या निकालानंतर १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मात्र वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या भाषणातून आता श्रेयवादाचे राजकारण होत असल्याचे समोर आले आहे. तसेच पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात गट पडल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे.

(हेही वाचा Modi 3.0 : काय आहे नवनियुक्त खासदारांची पार्श्वभूमी; जाणून घ्या…)

बॅनर आणि सोशल मीडियावरील पोस्ट 

राष्ट्रवादीच्या (NCP) चांगल्या कामगिरीनंतर पक्षाच्या मुख्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटील ‘किंगमेकर’ ठरल्याचे बॅनर लावले. या बॅनरवरून पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. १० जून रोजी अहमदनगर येथे पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयाचे श्रेय हे शरद पवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले. रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले, पुढील काळात कुणी स्वतःला किंगमेकर म्हणवून घेईल. पण हा विजय कुणा एका नेत्यामुळे झालेला नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला घवघवीत यश मिळालं. तसेच शरद पवार यांनी या वयात ज्या तडफेने प्रचार केला, त्याचेही आपल्याला कौतुक करावे लागेल.

जयंत पाटलांनी टोचले कान 

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ६ जून रोजी एक्सवर एक पोस्ट टाकून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. या मागणीचे निश्चित कारण काय? याबद्दल त्यांनी कोणतेही सुतोवाच केले नव्हते. या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. यावर जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)  शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून येणे, हे टीम वर्क आहे. आपल्याला टीम म्हणूनच राहिले पाहिजे. त्यामुळे चुक होत असेल तर कानात सांगा, जाहीररीत्या सांगू नका, सहा महिने मी प्रदेशाध्यक्ष पदावर आहे, त्यानंतर मी या पदावर नसणार आहे, तेव्हा सहा महिने थांबा, कुणीही याविषयावर सोशल मीडियावर बोलू नये, अशा शब्दांत त्यांनी कान टोचले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.