मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असले तरी आजवर हे खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान योग्यच असल्याचा दावा आजवर महापालिका प्रशासनाकडून ठामपणे केला जात होता. परंतु आजवर कोल्डमिक्सचे तंत्रज्ञानच चांगल्या दर्जाचे असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाकडून आता खड्डे भरण्यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात सरकार बदलताच नव्या मुख्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी कोल्डमिक्सऐवजी नवीन तंत्राचा वापर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.
खड्डे भरणी किमान ३ ते ४ महिने टिकू शकते
मुंबईच्या रस्त्यांवर सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे ते पुन्हा खड्डे होतात. खड्डे भरण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता, खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. एम ६० ग्रेड मध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये मोठ्या आकाराच्या लादी बनवून (प्रीकास्ट काँक्रिट प्लेट्स) वापरणे शक्य आहे किंवा कसे हे तपासावे. यामुळे खड्डे लवकर भरून वाहतूक लवकर सुरू होवू शकते. ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे एम ६० काँक्रिट वापरून खड्डा भरता येऊ शकेल व खड्डे भरणी मजबूत होईपर्यंत त्यावर पोलादी फळी (स्टील प्लेट) टाकावी जेणेकरून वाहतूक सुरळीत राहू शकेल याची देखील चाचपणी करण्यात यावी. अशा प्रकारची खड्डे भरणी किमान ३ ते ४ महिने टिकू शकते, त्यादृष्टीने देखील चाचपणी करावी, असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. फ्लाय ऍश अर्थात राखेपासून बनविलेल्या ब्लॉकचा देखील यामध्ये उपयोग करता येईल किंवा कसे, याचाही सांगोपांग विचार करण्याचे निर्देश वेलरासू यांनी दिले.
(हेही वाचा दिल्लीत शिवसेनेची पळापळ, लोकसभा अध्यक्षांची घेतली भेट)
पाऊस आणि वाहतुकीच्या ताणामुळे खड्ड्यांचा टिकाव लागत नाही
पावसाळ्यात रस्त्यांवर उद्भवणारे खड्डे भरण्याची कार्यवाही प्रामुख्याने विभाग कार्यालयांच्या स्तरावर कार्यवाही केली जाते. पण कोल्ड मिक्स सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरण्यात येत असले तरी जोरदार पाऊस आणि वाहतुकीच्या ताणामुळे खड्ड्यांचा टिकाव लागत नाही. खड्डे पुन्हा तयार होवून खडी व इतर कण रस्त्यावर पसरून प्रसंगी अपघातालाही निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे त्यावर देखरेख करण्याचा अतिरिक्त ताणही महानगरपालिकेच्या यंत्रणेवर येत आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये आणि खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता मिळावी म्हणून लवकरात लवकर नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचणी करणे आवश्यक असल्याचे वेलरासू यांनी स्पष्ट केले.
सव्वा तीन हजार कोल्डमिक्साचा वापर करण्यात आला
मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी २०१८-१९ मध्ये कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. परंतु कोल्डमिक्सच्या वापरानंतरही मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि कोल्डमिक्सचा खड्डयांमध्ये टिकाव धरला जात नसल्याने लोकप्रतिनिधींकडून वारंवार टिका होत होती. प्रशासनावर वारंवार आरोप होऊनही प्रशासनातील अधिकारी हे तंत्रज्ञान किती चांगल्या प्रतीचे आहे, चांगल्या दर्जाचे आहे याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. आजवर मुंबईच्या रस्त्यांवर सव्वा तीन हजार कोल्डमिक्साचा वापर करण्यात आला असून हे तंत्रज्ञान पूर्णपणे निष्फळ ठरले आहे. परंतु राज्यात शिंदे व फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर, नव्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनांची दखल घेत प्रशासनाने आता कोल्डमिक्स हे तंत्र खड्डे भरण्यासाठी योग्य नसल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले आहे. राज्यातील नव्या सरकारचा विश्वास प्राप्त करण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रशासनाने आता कोल्डमिक्सला पर्याय म्हणून खड्डे भरण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यापूर्वी स्थायी समितीच्या सभेत तसेच महापालिका सभागृहात नगरसेवकांनी कोल्डमिक्सविरोधात आवाज उठवल्यानंतर त्या तंत्रज्ञानाचे दाखले देणारे प्रशासनाला आता हे तंत्रज्ञान बदलण्याची गरज का भासू लागली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Join Our WhatsApp Community