मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी लावण्यात आलेल्या नावाच्या पाटीवरील तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव लाल रंगाने पुसून टाकण्याचा शिवसेना उध्दव गटाने केल्यानंतर, महापालिकेच्या देखभाल विभागाने या फलकावरील लाल रंग अवघ्या काही तासांमध्ये पुसून टाकला. प्रशासनाने सावधगिरी बाळगत वेळीच हा लाल रंग पुसून टाकल्याने बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून होणारा प्रतिहल्ला टळला गेला.
( हेही वाचा : मुंबईत एका कुटुंबावर ग्रामस्थांकडून ‘सामाजिक बहिष्कार’; ग्रामस्थ मंडळावर गुन्हा दाखल )
महापालिकेत शिवसेनेच्या ८४ नगरसेवकांसह त्यानंतर पक्षात प्रवेश केलेले मनसेचे नगरसेवक आणि जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार शिवसेनेला मोठ्या आकाराचे पक्ष कार्यालय देण्यात आले होते. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जुन्या कार्यालयांच्या जागेवर महापालिका चिटणीस विभागाच्या नुतनीकरण करण्यात आल्यानंतर जुन्या इमारतीच्या तळ मजल्यावर सर्व पक्षांना कार्यालये देण्यात आली. सर्व पक्षांनी कार्यालयांचा ताबा घेतल्यानंतरही पुन्हा नुतनीकरणाच्या नावाखाली अनेक महिने हे कार्यालय बंद होते. परंतु कोविडनंतर युवा सेना अध्यक्ष आणि तत्कालिन मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे कार्यालय तिथे स्थलांतरीत झाले. या कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी स्वत: तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पुढाकार घेत स्वत: खर्च केला होता. त्यामुळे या कार्यालयाचे उद्घाटन करताना लावलेल्या नामफलकावर यशवंत जाधव यांच्या नावाचा उल्लेख होता. परंतु शिवसेनेतून फुटून यशवंत जाधव व आमदार यामिनी जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या नावावर कागदाची चिकटपट्टी लावली होती. ही चिकटपट्टी बुधवारी या कार्यालयाचा ताबा घेताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काढून टाकली. परंतु गुरुवारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी या नामफलकावरील यशवंत जाधव यांच्या नावावर लाल रंग फासला होता.
या घटनेची माहिती मिळताच दुपारच्या सुमारास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते जमू लागले. तसेच महापालिका सुरक्षा विभागाला याची कुणकुण लागताच त्यांनी महापालिकेच्या देखभाल विभागाला कळवून पाटीवरील हा रंग पुसण्यास भाग पाडले. त्यामुळे देखभाल विभागाने हा रंग पुसला. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते बाहेरुनच निघून गेले. महापालिकेच्या सुरक्षा विभागाने प्रसंगावधान राखल्याने शिवसेनेच्या गटाकडून होणारे आंदोलन त्यांना टाळता आले.
Join Our WhatsApp Community