नागरिकांशी आत्मियतेने संवाद साधा! एकनाथ शिंदेंनी घेतला अधिकाऱ्यांचा ‘क्लास’

112

राज्यभरातून अनेकजण मंत्रालयात आपल्या समस्या घेऊन येतात. त्यांना सचिवांनी वेळ दिला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न सोडविताना सकारात्मकता ठेवा, त्यांच्याशी आत्मियतेने संवाद साधा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. शिवाय केंद्र पुरस्कृत आणि राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालयात सचिवांची बैठक 

शासनाच्या सर्व विभागांतील सचिवांची बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा प्रकारची ही पहिली बैठक होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिंदे म्हणाले, देशात महाराष्ट्राची चांगली प्रतिमा आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच केंद्रीय मंत्री देखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी आपण नावीन्यपूर्ण योजना मांडल्या पाहिजेत. केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, हे पाहून तात्काळ असे प्रस्ताव सादर करावेत. विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढवावा. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करताना गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिले नाही! नारायण राणेंचा गौप्यस्फोट)

गुणवत्तेशी तडजोड नको

  • शासन आणि प्रशासन ही राज्य कारभाराच्या रथाची दोन चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकाभिमूख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमबजावणी करावी. राज्यातील नवीन सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. सरकारची प्रतिमा ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. यासाठी सर्वांनी राज्याच्या हिताची कामे प्रभावीपणे करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
  • राज्यातील शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यासाठी गती द्यावी. राज्यातील रस्त्यांची सुधारणा करताना नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोणत्याही कामामध्ये गुणवत्तेत तडजोड करु नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.