होळी किंवा अन्य सणाला कोकणात जाताना चाकरमान्यांना ८-१० तास लागतात, लहान मुलांना घेऊन ट्रॅफिकमध्ये ताटकळत राहावे लागते. म्हणूनच मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यायी सर्विस रोड किंवा पर्यायी वाहतूकीची सोय करा आणि कोकणातील संबंधितांशी तातडीने संयुक्त बैठक घेऊन कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी अधिवेशनात केली.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या सदस्थितीबाबत तसेच कोकणवासीय आणि चाकरमान्यांचे प्रवासात होणारे हाल याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाला गतीने पुढे नेणारा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. राज्यकर्त्यांनी ठरवले तर हा महामार्ग वेळेत पूर्ण होऊ शकतो. समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण आहे. या मार्गाची जबाबदारी केंद्राची की राज्याची हा प्रश्न उपस्थित न करता याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या, दरेकरांचा सवाल
दरेकर पुढे म्हणाले की, होळीला मोठ्या प्रमाणावर लोक कोकणात जातात. मुंबई-गोवा महामार्गाचा हा विषय कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आहे. कंत्राटदाराला तीन वेळा मुदतवाढ दिली. अजूनही या महामार्गाची कामे पूर्ण झालेली नाहीत. नेमकी त्यामागची काय कारणे आहेत? आतापर्यंत किती खर्च झाला? आणि काम कधी पूर्ण होणार आहे? तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा कामाला विलंब झाल्याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करणार का? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
( हेही वाचा : शेतक-यांची वीज कापली तर खबरदार…विरोधकांचा इशारा )
कोकणवासीयांचे हाल
मागील पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले. आता दोन महिन्यांनंतर पाऊस सुरू होईल. मागे पाऊस पडला तेव्हा रस्त्यावर पाणी तुंबले होते. अर्धवट कामांमुळे हायवेला चिखल निर्माण होतो व अपघात होतात यासंदर्भात सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत? त्यासंदर्भात काय दक्षता घेतली आहे? सिमेंटचे रस्ते तयार करताना या रस्त्याखालील पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्यावर कोकणात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे निर्माण झाली आहे असेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.
शासनाने अशा प्रकारच्या क्रॉस होणाऱ्या नादुरुस्त वाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे का? त्याचा काही आराखडा तयार केलाय का? हा खर्च कंत्राटदाराकडून वसूल करणार का? या नादुरुस्त वाहिन्यांमुळे गावागावात आज पाणी मिळत नाही. केंद्र शासन, राज्य सरकार आपण बैठका खूप घेताय. प्रामाणिक प्रयत्नही होत आहेत पण आता या महामार्गाबाबतची नेमकी सद्यस्थिती काय आहे? कोकणच्या जनतेला आपण कधीपर्यन्त हा महामार्ग उपलब्ध करून देणार आहात, असा प्रश्न लक्षवेधीद्वारे दरेकर यांनी विचारला आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा अशी व्यवस्था सरकारने तातडीने करावी, अशी मागणीही केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व कोकणच्या संबंधितांसोबत संयुक्त बैठक घ्यावी. यंदाच्या होळीसाठी प्रवाशांना सुखरूप चार ते पाच तासात पोहचता येईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी असल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेतली जाईल, जिथे ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या जागा शोधून पर्यायी मार्ग कसा उपलब्ध करता येईल याकडे लक्ष दिलं जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे.