शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये धारावीत राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

सध्या शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात यावरुन राजकारण पेटले असताना आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक बाचाबाची झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

धारावी मिल कंपाऊंड येथील मॉर्निंग स्टार शाळेत शिंदे गटाची दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या समर्थकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे.

याची दखल घेत धारावी पोलिसांनी ठाकरे गटातील राजेश सूर्यवंशी,मुथू पठाण,चेतन सूर्यवंशी यांच्यासह इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीन जणांना अटक झाल्याची माहिती देखील मिळत आहे. जमाव बंदीचे उल्लंघन,धमकी, पोलिसांचा आदेश न मानणे या कलमांतर्गत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here