राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या चेहेऱ्याला यापूर्वीच स्पष्ट नकार दिला आहे. तर शरद पवार यांनी ‘महाविकास आघाडी’ हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा असेल, असे जाहीर केल्यानंतर शुक्रवारी १९ जूनला उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी, “मविआ हा जारी आमचा चेहेरा असला तरी ‘मविआ’ला या क्षणी जो चेहेरा आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे,” असे सांगून ‘मविआ’चा चेहेरा हा उद्धव ठाकरेच आहेत, हे नाव न घेता अधोरेखित केले. यामुळे ‘मविआ’त नव्या वादाला तोंड फुटाण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी पक्ष किती ‘डेस्परेट’ झाला आहे, याचीही कल्पना येते. (Conflict In MVA)
पवारांनी व्यक्तीचा चेहेरा नाकारला
जून अखेरीस पत्रकार परिषदेत ‘ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री’ असं महाविकास आघाडीचं सूत्र आहे का? असे विचारले असता राऊत म्हणाले होते की, “असं कोणी सांगितलं? कोणी जाहीर केले का? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे हा धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक घटकांचं मतदान उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहेऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाहीत आणि लोकाना चेहेरा द्यावाच लागेल.” त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहेऱ्याबाबत शरद पवार यांनी जाहीर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आमची आघाडी आहे, हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. कोणत्याही व्यक्तीबिक्तीबाबत आमचा निर्णय झाला नाही. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे.” (Conflict In MVA)
(हेही वाचा – Lokmanya Smruti Pratishthan च्या वतीने लोकमान्य टिळकांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन)
राऊतांची पवारांवर कुरघोडी
शुक्रवारी राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अख्ख्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाचा चेहेरा कोण आहे हे माहीत आहे, असे वक्तव्य केले आणि ठाकरे यांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला. इतकेच नव्हे तर, “महाविकास आघाडी हा जारी आमचा चेहेरा असला तरी महाविकास आघाडीला या क्षणी जो चेहेरा आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे,” असे सांगून यांनी शरद पवार यांच्यावर कुरघोडी केली. (Conflict In MVA)
उबाठाची रणनीती
तसेच जागावाटपातही मुंबईत उबाठाला अधिक जागा मिळवण्यासाठी रणनीती आखली. लोकसभेला कोकणातून उबाठा हद्दपार झाले तरी राऊत यांनी कोकणावरील दावा सोडला नाही. ते म्हणाले, “मुंबई नेहमीच शिवसेनेचा गढ राहिला असून महापालिका, विधानसभा, लोकसभेला शिवसेनेच्या अधिक जागा निवडून आल्या आहेत. जसे विदर्भात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अधिक जागा मिळतात. आपापला गढ, प्रभावक्षेत्र असतं. मुंबई आणि कोकणात शिवसेनेचा प्रभाव कायम राहिला आहे, त्यामुळे त्या प्रमाणात जागावाटप होईल,” असे सांगून उबाठाला मुंबईतील अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती आखली, अशी चर्चा आहे. (Conflict In MVA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community