प्रभादेवी रेल्वे स्टेशन परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले. विकासकामांचे उद्घाटन करताना, श्रेयवादाच्या मुद्यावरुन दोन्ही गट समोरासमोर आल्याचे कळते. ठाकरे गटाकडून यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या भागातील विकासकामांचे उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होणार होते. परंतु यावेळी तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करुन उद्घाटनाला विरोध करण्यात आला. यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
( हेही वाचा: १०० पैकी २६ टक्के मोदींची जादू! मोदी लाट अजून संपली नाही? )
काय घडले नेमके ?
एल्फिस्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ याच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र याचवेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते इथे दाखल झाले. हे काम ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केले आहे. त्यांनीच या कामाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे याचे श्रेय शिवसेनेच्या ठाकरे गटाला जाते, असा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
यावरुन श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित झाला. समाधान सरवणकर हे उद्घाटन करत असतानाच ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला. याबाबत अजय चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले की, याचे संपूर्ण काम मी केले असताना, शिंदे गटाकडून अशाप्रकारे उद्घाटन केले जात असेल तर आम्ही विरोध करु. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट विकासकामांच्या नुतनीकरणाच्या उद्घाटनाच्यावेळी एकमेकांसमोर आले.
Join Our WhatsApp Community