महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून प्रचंड बेबनाव दिसत आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार, या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवत असतात, तथापी नाना पटोले हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे स्वाभाविक ते राज्यातील कॉंग्रेसचे प्रमुख आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला नक्कीच किंमत आहे, परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये यावरून आता वादाची ठिणगी उडाली असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
राज्यशासनाने जाती जमातींना न्याय द्यावा!
आरक्षण रद्द झाल्यावर रिक्त जागा भरल्या जात आहे, त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, आरक्षण रद्द झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रयत्न होणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारे जागा भरण्याची घाई न करता जर खुल्या वर्गातून जागा भरल्या तर ज्यांना एसईबीसीचा लाभ होणार आहे. तसेच खुल्या वर्गालाही संधी मिळाली पाहिजे, याबाबत काही दुमत नाही. आरक्षणाचा तिढा हा सामाजिक आहे. त्यामुळे संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. राज्य शासनाने त्यासाठी प्रयत्न करावे. जाती जमातीबद्दल भांडण लावायचे काम अशा प्रकारच्या विविध निर्णयातून सरकारने करू नये.
(हेही वाचा : शैक्षणिक शुल्कावर नियंत्रण ठेवणारी समिती काय करते? उच्च न्यायालयाकडून विचारणा )
शिवसेनेने हिंदुत्वाचा विचार बासनात गुंडाळला!
राम मंदिर विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, शिवसेनेची राम मंदिरावर घेतलेली भूमिका पाहता शिवसेनेने आपला हिंदुत्वाचा नैतिक अधिकार गमावला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या वेळेला राम मंदिराचे भूमिपूजन होते तसेच हिंदुत्वाच्या ज्या ज्या भूमिका आतापर्यंत शिवसेनेने घेतल्या त्या सगळ्या सत्तेसाठी बासनात गुंडाळण्यात आल्या. शिवसेनेने विरोधी विचारधारेच्या पक्षाशी हातमिळवणी करत राज्यामध्ये सरकार बनवले. शिवसेनेच्या अशा प्रकारच्या वक्तव्याला समाज मान्यता मिळणार नाही.
जबाबदारीचे सोने करायची क्षमता राणे यांच्यामध्ये!
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली घडत असताना नारायण राणे दिल्लीला रवाना झाले असून राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची शक्यता व्यक्त होत आहे, त्यावर दरेकर म्हणाले, राणे महत्वाचे नेते आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. जर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल तर त्यांचा विचार केला जाऊ शकेल, हा सर्वस्वी अधिकार केंद्रीय नेतृत्वाचा असल्यामुळे मी फक्त शुभेच्छा देऊ शकतो. कारण योग्य तो निर्णय केंद्रीय नेतेमंडळी घेतील. राणेंनी बेस्ट कमिटीचा अध्यक्ष असेल, दुग्धविकास मंत्री असेल, महसूल मंत्री असेल किंवा राज्याचा मुख्यमंत्री त्यावर राज्याचा विरोधी पक्षनेते म्हणून राणे यांनी आपली जबाबदारी योग्यपरीने पार पाडत कोकणाला, राज्याला न्याय देण्याचे काम केले आहे. जी काही जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीचे सोने करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर काल खासदार संभाजी छत्रपती यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली त्यावर दरेकर म्हणाले, दोन राजे एकत्र येणे राज्याच्या दृष्टीने, मराठा समाजाच्या दृष्टीने या आरक्षणाच्या निर्णयावर महत्वाचे ठरले. त्याबद्दल अभिनंदन करतो. अत्यंत स्पष्ट भूमिका दोघांची आहे. मराठा समाजाच्या बाबतीत हिताची भूमिका आहे. इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community