राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल गुरुवारी, २ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार असल्यामुळे कोणता उमेदवार विजय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण त्यापूर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघातीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंचा विजय जाहीर केला आहे. पुण्यातील पाषाण परिसरात सत्यजित तांबेंच्या विजयाचे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळे पुण्यातील या पोस्टरची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने पाषाण परिसरात सत्यजित तांबे यांचा विजय झाल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘जीत’ सत्याची विजय ‘नव्या’ पर्वाची! नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांचे हार्दिक अभिनंदन! शुभेच्छुक, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनीही आपल्या विजयाचा दावा केला आहे.
(हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप)
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत २२ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. अपक्ष सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत असून कोण विजयी होणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community