काँग्रेसचे महागाईविरुद्ध आंदोलन, नेते पडले बैलगाडीवरून !

71

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या जीवघेण्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसकडून ७ जुलै ते १७ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये आंदोलन सुरु केले असून, या आंदोलनाचा फटका शनिवारी, १० जुलै रोजी काँग्रेसलाच बसल्याचे पहायला मिळाले होते. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईतील प्रतिक्षा नगर येथे आंदोलन केले, मात्र या आंदोलनाचा फज्जा उडाला. बैलगाडीवरून करण्यात आलेले आंदोलन भाईंच्या चांगलेच अंगाशी आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

… अन् बैलगाडीच तुटली!

मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह मुंबईतील काही कार्यकर्त्यांनी बैलगाडीवरून आंदोलनाला सुरुवात केली. मात्र बैलगाडीवर इतके वजन झाले की, त्या वजनाने चक्क बैलगाडी तुटली अन् भाईंसोबत सर्व कार्यकर्ते थेट जमिनीवर कोसळले. यातील काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

जेव्हा काँग्रेसचे नेते ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’, अशी घोषणा देत होते, तेव्हाच बैलगाडी तुटली, कदाचित बैलांना ही घोषणा आवडली नसावी, म्हणून ती बैलगाडी तुटली.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

(हेही वाचा : अडचणीत सापडलेले खडसे एकटे का पडले? वाचा…)

अकरा दिवस काँग्रेसचे आंदोलन

महागाई विरोधात मुंबई काँग्रेसकडून ७ जुलै ते १७ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये आंदोलनाला सुरुवात केली असून, नुकतीच भाई जगपात यांनी पत्रकार परिषदेत आपल्या आंदोलनाची भूमिका मांडली होती. देशभरात महागाई वाढली आहे. कोरोना काळ असला तरी जगभरात इंधनाची परिस्थिती वेगळी आहे. तत्कालीन काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात १४० डॉलर प्रति क्रूड ऑईल बॅरेल होते. त्यावेळी ७२ रुपये प्रति लिटर पेट्रोल नागरिकांना मिळत होते. सध्या क्रूड ऑईलचे दर कमी झाले आहेत. तरीही आपल्या देशात चुकीच्या धोरणामुळे इंधनाचे दर गगनाला भिडत आहे. त्यामुळे, नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम मुंबई काँग्रेसने हाती घेतला आहे. त्यानुसार ७ जुलै ते १७ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये ही आंदोलने कोविडचे निर्देश पाळून करण्यात येतील. या आंदोलनात मुंबई महिला काँग्रेसचा प्रामुख्याने सहभाग असेल. तसेच, मुंबईतील १०० पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात मुंबई युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय.च्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल असे भाई जगताप यांनी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.