लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा केंद्राला डोस!

ज्या पद्धतीने कूर्म गतीने लसीकरण सुरु आहे, ते असेच जर चालू राहिले. तर लसीकरण संपायला २०२४ उजाडेल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यानंतर पक्षात नवी उमेद निर्माण झाली असून लसीकरणाच्या मुद्द्यांवरून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. बोरिवली, अंधेरी पश्चिम येथे मागील दोन दिवसांत आंदोलन झाल्यानंतर शनिवारी महालक्ष्मी मंदिर परिसरात भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

मुंबई काँग्रेसतर्फे संपूर्ण मुंबईभर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकार विरोधात ‘मोदीजी हमारे बच्चो कि वॅक्सीन को विदेश क्यों भेज दिया?’ हे आंदोलन केले जात आहे. शनिवारी मुंबईतील महालक्ष्मी मंदिर परिसरात झालेल्या या आंदोलनामध्ये भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील नरसाळे, सरचिटणीस सुशीबेन शाह, नगरसेवक राजेंद्र नरवणकर, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, सहखजिनदार अतुल बर्वे, माजी नगरसेविका बिनीता व्होरा, मुंबई काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच महिला कार्यकर्त्यांचा या आंदोलनामध्ये मोठा सहभाग होता.

मोदींनी लसी अगोदरच इतर देशांना पाठवल्या!

आज कोविडची दुसरी लाट जगभरात पसरलेली असताना, प्रत्येक देश आपल्या नागरिकांचे मोफत लसीकरण करत आहे. पण ज्या भारतामध्ये सर्वात जास्त लसींची निर्मिती केली जाते, त्या देशातील लोकांना लस मिळत नाही. लसीसाठी पैसे मोजावे लागत आहे. कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसी अगोदरच इतर देशांना पाठवल्या, हे या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे असल्याचे सांगत भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी बोलतांना भाई जगताप पुढे म्हणाले की, आजचे आंदोलन हे जनमानसाच्या मनातील मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात उद्रेक आहे, आज संपूर्ण मुंबईत व महाराष्ट्रात लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. पण त्यात रोज किती लोकांचे व्हॅक्सिनेशन होते? रोज जास्तीत जास्त १०० लोकांचे व्हॅक्सिनेशन होत आहे. हे काय चालले आहे मोदीजी? ज्या जनतेच्या जीवावर तुम्ही दोन वेळा केंद्रामध्ये निवडून आलात, त्यांनाच लस का मिळत नाही? महाराष्ट्रातील व देशातील जनतेला वॅक्सीनसाठी वणवण का करावी लागत आहे? आज जगात कोविड १९ ची वॅक्सीन सर्वात जास्त प्रमाणात भारतात बनते. ही वॅक्सीन जर प्रथम आपल्या देशातील नागरिकांना दिली असती, नंतर इतर देशांना पाठवली असती, तर ही परिस्थिती आज उद्भवलीच नसती. जगातील सर्व देशांनी हेच केले. या देशात बनणारी १५० रुपयांची लस नरेंद्र मोदी यांनी परदेशात पाठवली आणि आता रशियाकडून आलेली स्फुटनिक ही लस १००० रुपये मोजून लोकांना घ्यायला भाग पाडले जात आहे.

(हेही वाचा : सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय! आता तरी जागे व्हा!)

तर लसीकरण संपायला २०२४ उजाडेल!

‘विपदा में अवसर ढुंढना’ या नीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी चालत आलेले आहेत, जनतेच्या आयुष्याशी खेळ करून त्याचा व्यापार करणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच थांबवावे. आज आमच्या मुलांना वॅक्सीन मिळत नाही आहे. जे पोलिस आणि पत्रकार बांधव आज जीवाचे रान करून आपले कर्तव्य बजावत आहेत, त्यांना आज वॅक्सीन मिळत नाही आहे. या आधी सुद्धा विविध प्रकारच्या १३ लसी भारतात तयार झालेल्या होत्या. त्या लसी आजही कोणतेही व्यापारीकरण किंवा गाजावाजा न करता मोफत मिळत आहेत. मग कोविड १९ च्या लसी मोफत का मिळू शकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदी हे गंगा पुत्र असल्याचे ते म्हणतात. पण आज गंगेतून मोदी सरकारचे पाप वाहत येत आहे, हे चांगले दिसत नाही. तुम्ही एक निर्णय घ्या कि देशातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण आम्ही करू, जी आमची सुरुवातीपासून मागणी आहे. ज्या पद्धतीने कूर्म गतीने लसीकरण सुरु आहे, ते असेच जर चालू राहिले. तर लसीकरण संपायला २०२४ उजाडेल. मग त्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरु होईल. म्हणून सर्व राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुसार लसींचा पुरवठा करा व सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here