काँग्रेसचे आंदोलन बेगडी, मालमत्ता लुटण्याचा अधिकार नाही; Raosaheb Danve यांचे टीकास्त्र

112
काँग्रेसचे आंदोलन बेगडी, मालमत्ता लुटण्याचा अधिकार नाही; Raosaheb Danve यांचे टीकास्त्र
  • प्रतिनिधी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मालमत्ता हडपणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून, हे आंदोलन बेगडी असल्याची घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. बुधवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. दानवे म्हणाले, “काँग्रेसला आंदोलनाचा अधिकार आहे, पण कोणाचीही मालमत्ता आणि निधी लुटण्याचा अधिकार नाही.”

(हेही वाचा – National Herald Case : गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही; विनोद तावडेंचा पलटवार)

नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपशील देताना दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, “१९३७ मध्ये ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी उदात्त हेतूने सुरू केलेले हे वर्तमानपत्र आणि कंपनी गांधी-नेहरू कुटुंबाची जहागीर नव्हती. त्यांच्याकडे मालकी हक्काची नोंद नाही. तरीही काँग्रेसने ‘यंग इंडिया’ कंपनी स्थापन करून मालमत्तेचा दुरुपयोग केला.” २०१२ मध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करत याचिका दाखल केली होती. त्यात ‘यंग इंडिया’ने नियमांच्या विरोधात ९० कोटी २५ लाख रुपये वसूल केल्याचा उल्लेख होता.

(हेही वाचा – “पोपटपंची करत माध्यमांत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न”; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर Pravin Darekar यांचा हल्लाबोल)

दानवे (Raosaheb Danve) पुढे म्हणाले, “२००८ मध्ये आर्थिक अडचणीमुळे वर्तमानपत्र बंद पडले. तेव्हा काँग्रेसने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ला ९० कोटींचा निधी दिला, जो बेकायदेशीर आहे. कोणत्याही खासगी संस्थेला पक्षाचा निधी देणे नियमाविरुद्ध आहे.” या कंपनीकडे दिल्ली, लखनऊ, भोपाळ, मुंबई, इंदौर, पटना आणि पंचकुला येथे मालमत्ता आहेत, ज्यांचा काँग्रेसने गैरवापर केल्याचा आरोप आहे. दानवे यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणेने चौकशी केली असून, पुढील कारवाई सुरू आहे. काँग्रेसने केलेला हा भ्रष्टाचार उघड झाला असून, त्यांचे आंदोलन बेगडी आहे, असा घणाघात त्यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.