राज्यपालांच्या मुद्द्यावर उद्धवसेना एकाकी; महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा प्रस्ताव गुंडाळला?

76

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेत ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा दिला. बुधवारी विरोधकांच्या बैठकीत त्याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फारसा रस न दाखवल्याने उद्धवसेना या मुद्द्यावर एकाकी पडली.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ योजना! फक्त १९९ रुपयात महिनाभर प्रवास; चलो अ‍ॅपचे नवे प्लॅन्स फक्त एका क्लिकवर…)

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात बुधवारी महाविकास आघाडीतील घटकपक्षांची बैठक आयोजित करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात कोणते विषय घ्यावे, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. यावेळी कोश्यारी यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्याबाबत उद्धवसेनेने आग्रही भूमिका मांडली. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फारसा रस न दाखवल्याने निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा प्रस्ताव गुंडाळला की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

अजितदादांचा जुजबी विरोध

महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या विषयावर जुजबी प्रतिक्रिया दिली. शिंदे-फडणवीसांनी वाचाळवीरांना आवरावे. राज्याच्या राज्यपालांनीही जबाबदारीने बोलावे. युगपुरुष शिवाजी महाराज यांची तुलना करता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.