अंतिम निर्णयाआधीच काँग्रेसने जाहीर केले अनलॉक! ठाकरे सरकारमध्ये पुन्हा विसंवाद!

अनलॉक निर्णय अद्याप अंतिम झाला नाही. हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

123

राज्यात या ना त्या कारणावरून ठाकरे सरकारमध्ये विसंवाद असल्याचे दिसून येत असताना आज पुन्हा एकदा बैठकीत झालेला निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आधीच माध्यमांना सांगण्याचा खोडसाळपणा महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केला आहे. आपत्ती व्यवस्थापन बैठकीत अनलॉकच्या संबंधी चर्चा झाली, काही धोरण ठरले, परंतु त्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, असे ठरले असताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र बैठक संपताच सरकारच्या वतीने निर्णय जाहीर करून टाकले. आता सरकारच्या वतीने सारवासारव सुरु झाली आहे. अशा प्रकारे काँग्रेसने विशेषतः वडेट्टीवार यांनी सरकारला पुन्हा अडचणीत आणले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनच्या वेळी हेच वडेट्टीवार परस्पर ‘लोकल अमुक दिवशी सुरु होईल’, असे जाहीर करायचे आणि रेल्वे त्यावर नकार द्यायची, असे तब्बल ४ वेळा वडेट्टीवार यांनी मुंबईकरांची फसवणूक केली होती. आता अनलॉक संबंधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळविली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा : लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार? ठाकरे सरकारच आहे संभ्रमात)

काय आहे शासनाचे म्हणणे?

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक-दि-चेनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल, तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असे सरकराच्या वतीने सांगण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.