देशात सध्या जेवढे ओमायक्रोनचे रुग्ण आहेत, त्याच्या अर्धे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची थेट शिवाजी पार्कात सभा घेण्याचे काँग्रेसने ठरवले होते, मात्र स्वतःच्याच सरकारने या सभेला परवानगी दिली नाही, म्हणून अखेर काँग्रेसने या सभेचा नाद सोडला आहे, तूर्तास ही सभा पुढे ढकलली आहे, अशी घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली.
सध्या ओमायक्रोनचा संसर्ग राज्यात वाढत आहे, त्यामुळे २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांची दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कात होणारी सभा तूर्तास रद्द करण्यात आली आहे, ती भविष्यात घेतली जाईल, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा राज ठाकरे म्हणतायत, ‘लोक मला फुकट घालवत आहेत!’)
स्वतःच्या सरकारविरोधात गेलेले न्यायालयात
जेव्हा काँग्रेसने या सभेचे आयोजन केले होते, तेव्हापासून या सभेची चर्चा सुरु झाली होती. या सभेला ठाकरे सरकार परवानगी देणार की नाही यावर तर्कवितर्क लढवले जात होते. अखेरीस ठाकरे सरकार परवानगी देत नाही, हे लक्षात येताच काँग्रेस स्वतःच्याच सरकारच्या विरोधात मुंबईत उच्च न्यायालयात गेले आणि सभेला परवानगी देण्याची मागणी करू लागले. मात्र ही याचिका दाखल केल्यावर दुसऱ्याच दिवशी अर्थात मंगळवारी, १४ डिसेंबर रोजी काँग्रेसने ही याचिकाही मागे घेतली.
एमआयएमने दिले होते आव्हान
दरम्यानच्या नुकतीच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची मुंबईत सभा झाली, त्याआधी पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादवरुन मुंबईत वाहनांची रॅली काढली. या सर्व कार्यक्रमांना राज्य सरकारने बंदी घातली होती. मुंबईत १४४ कलम लावले होते, ओमायक्रॉनचे कारण देते प्रतिबंध केला होता, तरीही ही सभा आणि रॅली काढण्यात आली, तेव्हा ओवैसी यांनी भाषणात ठाकरे सरकारला आव्हान दिले होते की, जसा एमआयएमच्या सभेवर प्रतिबंध लावला, १४४ कलम लावले, तसे राहुल गांधींच्या सभेवरही प्रतिबंध लावून दाखवावे.
Join Our WhatsApp Community