काँग्रेसला हरण्याची भीती? ऐनवेळी बदलला उमेदवार

101

नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. नागपुरात शुक्रवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर मतदार संघासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

10 डिसेंबरला मतदान

भाजप नेते गिरीश व्यास यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान तर निकाल 14 डिसेंबरला जाहीर होणार आहे. नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे.

भाजपाकडून बावनकुळे मैदानात

काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. गेली 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार होते. परंतु निवडणुकीला काही तास शिल्लक असताना काँग्रेसने मंगेश देशमुख यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. तर भाजपकडून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींच्या मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 314 काँग्रेसचे 144 आणि इतर 98 असे एकूण 556 मतदार शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावतील.

 ( हेही वाचा संजय राऊत म्हणतात, ‘मी वापरलेला ‘तो’ शब्द योग्यच! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.