Vijay Wadettiwar : अखेर विरोधीपक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार विराजमान

205
Vijay Wadettiwar : अखेर विरोधीपक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार विराजमान

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे रिक्त झालेल्या विरोधीपक्ष नेतेपदावर काँग्रेसकडून (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्यासंदर्भातील पत्र दिल्यानंतर गुरुवारी, ३ ऑगस्ट रोजी वडेट्टीवार यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी १७ जुलैपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. मात्र, अधिवेशनाचे दोन आठवड्यांचे कामकाज संपले तरी विरोधी पक्षनेता घोषित केला जात नसल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता या पदावर वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांची निवड करीत काँग्रेसने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

(हेही वाचा – Gyanvapi : अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली; ASI ज्ञानवापीचे सर्वेक्षण करणार)

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या जागी वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव त्यांच्या गाठीला आहे.दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांना गटनेते पदी कायम ठेवत काँग्रेसने मराठा आणि ओबीसी असे समीकरण साधले आहे.

‘हे’ होते दावेदार

– विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमधून विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुनिल केदार, संग्राम थोपटे इच्छुक होते. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रह धरल्याने हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

नाना पटोलेंनी वडेट्टीवारांवर अन्याय केला

वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विजय भाऊंना मी कधीपासून विचारत होतो, इकडे कधी येताय? त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, इकडे म्हणजे पहिल्या बेंचवर कधी येताय. आम्ही त्यांना हात मिळवत होतो, तेव्हा तुम्हा सगळ्यांचे चेहरे घाबरलेले होते. अधिवेशन सुरू होऊन ११ दिवस लोटले तरी त्यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे नाना पटोले तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.