माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे स्मारक उभारण्यास स्वतः काँग्रेस हायकमांडने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यनंतर काँग्रेसने प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारण्याचा विचार का केला नाही, असा सवाल करत काँग्रेस हायकमांडच्या वर्तवणुकीवर आक्षेप घेतला. त्यानंतर आता काँग्रेस हायकमांडकडून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा कसा आणि कधी अपमान करण्यात आला, याचे वृत्त प्रसारित होऊ लागले आहेत. त्यातच माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांच्या निधनानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांच्या पार्थिव शरीराचा कसा अवमान केला होता, याची कहाणीही माध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ लागली आहे.
नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. १९९१ ते १९९६ पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. नरसिंह राव यांचे २३ डिसेंबर २००४ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले, परंतु काँग्रेस हायकमांडच्या असहकार्यामुळे त्यांच्यावर दिल्ली ऐवजी हैदराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नरसिंह राव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष आणि विशेषत: सोनिया गांधी यांनी नरसिंह राव यांच्या पार्थिव शरीरासोबत कसलीही संवेदना दाखवली नाही. याविषयीचा उल्लेख न केवळ प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये आला आहे, तर त्याचा उल्लेख पुस्तकांमध्येही दिसून आला आहे. राव (P. V. Narasimha Rao) यांच्या कुटुंबीयांचे जबाबही रेकॉर्डवर आहेत. विनय सीतापती यांच्या ‘हाफ लायन’ या सुप्रसिद्ध पुस्तकात नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्काराच्या संपूर्ण घटनेचे तपशीलवार वर्णन केले आहे.
दिल्लीत अंत्यसंस्कार केल्यास कुणीही नेता येणार नव्हता
गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राव (P. V. Narasimha Rao) यांचा धाकटा मुलगा प्रभाकर यांना राव यांच्या पार्थिवावर हैदराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यास सांगितले होते, मात्र कुटुंबाने दिल्लीला प्राधान्य दिले. तीस वर्षांपूर्वी राव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर ते काँग्रेसचे सरचिटणीस, केंद्रीय मंत्री आणि शेवटी पंतप्रधान झाले, दिल्ली त्यांच्या कर्मभूमी आहे, म्हणून अंत्यसंस्कार दिल्लीतच व्हावे, असे कुटुंबीयांनी शिवराज पाटील यांना सांगितल्यावर पाटील यांनी, ‘असे झाले तर अंत्यसंस्काराला कोणताही नेता येणार नाही’, असे सहजपणे सांगितले.
सोनिया गांधींनी पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणू दिले नाही
तेव्हाच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आणखी एक सहकारी गुलाम नबी आझाद एम्समध्ये आले आणि त्यांनीही राव (P. V. Narasimha Rao) यांचे पार्थिव हैदराबादला नेण्याची विनंती त्यांच्या कुटुंबीयांना केली. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी राव यांचे पार्थिव 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव सिंधिया यांच्या पार्थिवासाठी काही वर्षांपूर्वी हे प्रवेशद्वार उघडण्यात आले होते, मात्र नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांचे पार्थिव मुख्यालयात आणण्यास काँग्रेस हायकमांडने सौजन्य दाखवले नाही. मुख्यालयाचे दार केवळ सोनिया गांधी यांच्याच आदेशाने उघडू शकते मात्र त्यांनी तो आदेश दिलेला नाही, असे त्यावेळी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. त्यावेळी राव यांचे पार्थिव शरीर असलेले लष्कराचे वाहन काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर सुमारे ३० मिनिटे थांबले होते, नंतर नाईलाजास्तव ते विमानतळाच्या दिशेने निघाले.
(हेही वाचा तालिबानी आणि Pakistan मध्ये कधीही सुरू होणार युद्ध; शस्त्रास्त्रे, रॉकेट लाँचर आणली सीमेवर)
राव यांच्या अंत्यसंस्काराला सोनिया गांधी अनुपस्थित
पंतप्रधान मनमोहन सिंग हे राव (P. V. Narasimha Rao) यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते आणि ज्यांनी भारताचा कायापालट करणाऱ्या क्रांतिकारी सुधारणांना सुरुवात केली, त्यांच्या मृत्यूनंतर राव यांना ज्याप्रकारे वागणूक दिली गेली त्याबद्दल मनमोहन सिंग नाराज होते. हैदराबादमधील हुसेन सागर तलावाच्या काठावर झालेल्या अंत्यसंस्काराला मनमोहन सिंग उपस्थित होते. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि भाजपा नेते अडवाणीही उपस्थित होते. पण सोनिया गांधी अनुपस्थित होत्या.
अपुऱ्या व्यवस्थेमुळे मृतदेहही अर्धवट जळाला
मृतदेहावर अग्निसंस्कार केल्यावर मान्यवर निघून गेले, तेव्हाही मृतदेह जळत होता. त्या रात्री (स्थानिक) दूरचित्रवाणी वाहिन्यांनी नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे फुटेज दाखवले, ज्याची कवटी अजूनही दिसत होती. भटके कुत्रे मृतदेह ओढत होते. हे पाहिल्यावर राव यांचे कुटुंबीय आणि सरकारी अधिकारी यांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली आणि मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा चिता पेटवली. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास राव यांची अर्धवट जळालेली हाडे, कवटी आणि शरीराच्या इतर अवयवांची धक्कादायक छायाचित्रे तेलुगू दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्कारासाठी पुरेशा लाकडाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे मृतदेह पूर्ण जळला नव्हता.
काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांच्याकडून अजब तर्क
काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘करेज अँड कमिटमेंट’मध्ये राव यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात न ठेवण्याबाबत अजब तर्क सांगितला. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, राव यांचे शरीर इतके जड होते की ते उचलून काँग्रेस मुख्यालयात ठेवणे कठीण होते, म्हणून काँग्रेस मुख्यालयाबाहेरून नरसिंह राव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी हैदराबादला पाठवण्यात आले.
बाबरी ढाचा पाडल्यामुळे सोनिया होत्या नाराज
काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांच्या पार्थिवाचा काँग्रेस हायकमांडने केलेल्या अवमानामागे एकच व्यक्ती होती, ती म्हणजे सोनिया गांधी. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येतील बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा कारसेवकांनी जमीनदोस्त केला. त्यावेळी नरसिंह राव हे पंतप्रधान होते. राव यांच्या सरकारने त्यावेळी जी भूमिका घेतली होती, त्यामुळे सोनिया गांधी नाराज होत्या. जर राव यांच्या पार्थिवाचा सन्मान केला तर मुस्लिम मतदार काँग्रेस पक्षावर नाराज होऊ शकतात, असे सोनिया गांधींच्या सल्लागारांनी सोनिया गांधींना सांगितले होते. सोनिया गांधी यांनी राव (P. V. Narasimha Rao) यांना पंतप्रधान बनवले, कारण ते त्यांच्या इशाऱ्यानुसार काम करतील असा सोनिया गांधी यांना विश्वास होता, त्याप्रमाणे नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) काही काळ वागलेही. पण नंतर राव यांनी सोनिया गांधी यांना रिपोर्ट करणे बंद केले, काही काळानंतर तर राव हे सोनिया गांधी यांना भेटण्याचेही टाळू लागले होते. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवण्यात आले, त्यांनी मात्र १० वर्षे सोनिया गांधी यांचा एकही शब्द खाली पाडू दिला नव्हता.
Join Our WhatsApp Community