काँग्रेसमुळे सरकार आहे, सरकारमुळे काँग्रेस नाही! नाना पटोलेंची तुफान फटकेबाजी

2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही आमचे काम करत आहोत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून काँग्रेस सत्तेच्या खुर्चीत बसली आहे. पण हे सरकार काँग्रेसमुळे आहे, सरकारमुळे काँग्रेस नाही असे मोठे विधान नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यासोबतच काँग्रेस हा यूपीएचा आत्मा आहे, त्यामुळे यूपीएच्या अध्यक्षपदावरुन इतर कोणी बोलायची गरज नाही, असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे.

ते विरोधकांचे ‘पोपट’

राहुल गांधींकडून आज देशाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. काँग्रेस पक्षच आज देशाला चांगले दिवस दाखवू शकतो, देश उभा करू शकतो, अशी भावना सध्या देशातील जनतेच्या मनात आहे. तरुण वर्गाला आज काँग्रेसबाबत विश्वास वाटत आहे. याआधी जे राहुल गांधींवर टीका करत होते, ते आता राहुल गांधींची स्तुती करायला निघाले आहेत. आता राहुल गांधींनाच देशाचे पंतप्रधान करू, अशी भूमिका सध्या तरुणांमध्ये आहे. त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्त्व कमकुवत आहे, असे बोलणारे नेते हे विरोधकांनी सोडलेले पोपट आहेत. राहुल गांधींमध्ये नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. म्हणूनच 2024 साली देशात राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचं सरकार येईल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

(हेही वाचाः भाजपमधून काँग्रेसमध्ये लवकरच मेगा ‘घरवापसी’… नानांनी दिले संकेत! मोदी सरकारवरही ओढले ताशेरे)

काँग्रेस यूपीएचा आत्मा

राजीव गांधींच्या नंतर काँग्रेसला सोनिया गांधींच्या रुपाने एक चांगले नेतृत्त्व लाभले. दोन वेळा त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने सत्ता स्थापन केली. आजही सोनिया गांधी यांना मानणारा देशात मोठा वर्ग आहे. जे लोक यूपीएचा अध्यक्ष बदलण्याची भाषा करत आहेत, ते स्वतःसुद्धा काँग्रेस हा यूपीएचा आत्मा असल्याचे मान्य करत आहेत. यूपीएचं नेतृत्त्व करण्याची क्षमता ही केवळ काँग्रेस पक्षातच आहे. त्यामुळे जे कोणी अध्यक्षपद बदलण्यासाठी वकिली करत आहेत, ते आत्म्याला बाजूला काढू शकत नाहीत. तसेच 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही आमचे काम करत आहोत, असेही पटोले म्हणाले.

आघाडीत बिघाडी नाही

महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये असणा-या मतभेदांबद्दल विचारले असता, सरकारमध्ये वैचारिक मतभेद होत असतात. फडणवीस सरकारमध्ये भाजप आणि शिवसेनेतील भांडण ही नळावरच्या भांडणांप्रमाणे होती. या सरकारमध्ये तसं काही नाही. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा चांगले दिवस दाखवण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. अजूनही सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची तक्रार समन्वय समितीच्या सदस्यांनी माझ्याकडे केली नाही. त्यामुळे विरोधक जी सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत, ती नक्कीच खोटी ठरुन पाच वर्षात या सरकारला कोणाही धक्का लावू शकत नाही, असा परपखड टोलाही त्यांनी विरोधी पक्षांना लगावला.

(हेही वाचाः लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार? ठाकरे सरकारच आहे संभ्रमात)

थोरांतांच्या नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह?

मविआ सरकारमध्ये काँग्रेस दुबळी पडत आहे का असे विचारले असता, काँग्रेसकडून सुरुवातीला या सरकारमध्ये आक्रमक भूमिका कोणी मांडत नव्हते, आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसने आपली ठाम भूमिका मांडली आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वावरही अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अधिवेशनात मी सर्वच विषयांवर काँग्रेसकडून ठाम भूमिका मांडली आहे. भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. कोरोना काळात राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून राज्यातील जनतेला आर्थिक मदत मिळावी ही काँग्रेसची या सरकारकडे मागणी आहे. हे सरकार काँग्रेसमुळे आहे, सरकारमुळे काँग्रेस नाही. त्यामुळे पहिल्यापासून राज्यातील जनतेच्या भल्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे.

राऊतांना यूपीए बाबत बोलायचा हक्क नाही

संजय राऊत आणि शिवसेना हे यूपीएचे सदस्य नाहीत. त्यामुळे यूपीएचे अध्यक्षपद कोणाकडे जावे, यावर बोलायचा त्यांना हक्क नाही. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं नाही करता येत. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यामुळे मी त्यांचा सन्मान करतो. पण वारंवार आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाला कोणी आव्हान करत असेल, तर तो कितीही मोठा नेता असला, तरी आम्ही त्यांना विरोध दर्शवणार. पण त्यांनी आमच्या नेत्यांची स्तुती केल्यावर आमच्यातील वाद संपला आहे.

(हेही वाचाः राऊतांच्या विधानाने नानासाहेब संतापले! फडणवीसांवरही साधला निशाणा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here