नानांचा आधी स्वबळाचा नारा, आता थेट मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर टीका!

महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना कळलं आहे, म्हणूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.

स्वबळाची भाषा करत आधीच महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण करणाऱ्या नाना पटोले यांनी आणखी एक वादाची फोडणी दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी जे आरोप केले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी आणखी पेटणार हे मात्र नक्की. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केल्याने आणखी एक वाद पेटला आहे.

नेमकं काय म्हणाले नाना?

त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे चालू आहे, हे सगळे अपडेट त्यांना द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना कळलं आहे, म्हणूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार, असे वक्तव्य नानांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नानांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद आता उमटत आहेत.

(हेही वाचाः महाविकास आघाडीतील वादविवादांवर ‘समन्वय समिती’चा उतारा!)

जनतेचा विश्वास काय मिळवणार?

महाविकास आघाडीतील आपआपसात असलेली भांडणं आता महाराष्ट्रातील जनतेसमोर  येत आहेत. आघाडीत सध्या विसंवाद असून सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या आरोपामुळे तिन्ही पक्षांचा एकमेकांवर किती अविश्वास आहे, हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं आहे. जर सरकारमधील तीन पक्षांचा एकमेकांवर विश्वास नसेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा काय विश्वास संपादन करणार? संपूर्ण कोव्हिड काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून कोणता सकारात्मक निर्णय घेतला? महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाठी कोणती ठोस पाऊले उचलली, असे प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केले आहेत.

(हेही वाचाः सोबत राहून पाठीत सुरा खुपसणार असाल तर… मित्र पक्षांवर नानांचा पुन्हा घणाघात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here