सत्यजित तांबेंवरून मविआत धुसफूस; संजय राऊतांच्या विधानावर काँग्रेसचा आक्षेप

106

पदवीधर निवडणुकीतील सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे राज्यातील राजकारणात एक नवा ट्विस्ट आला. पण त्यानंतर सत्यजित तांबे यांच्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. मविआतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष म्हणून काम करताना मविआत समन्वय गरजेचा आहे, असे विधान केले होते. पण राऊतांच्या या विधानावर काँग्रेसकडून आपेक्ष नोंदवण्यात आला आहे.

राऊतांच्या विधानावर काँग्रेस नेते काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘संजय राऊत दिल्लीत असतात, त्यांना फार गोष्टी माहित नसतात. त्यामुळे ते अनावधानाने बोलले असतील. तांबे काँग्रेसचे उमेदवार नाहीत. ते बंडखोर असतील, त्यांना काँग्रेसचा कोणताही पाठिंबा नसेल. मविआकडून जशाच तसा उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या १६ तारखेला कळेल.’

..यावरून मविआत दुमत नव्हते – अशोक चव्हाण

तसेच काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण म्हणाले की, ‘मविआत समन्वय आहे. कारण ही जागा तशी काँग्रेसची आहे. सत्यजित तांबे यांना काँग्रेसचे वरच्या सभागृहातील नेते म्हणून घोषित केले होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसची होती. यावरून मविआत दुमत नव्हते.’

संजय राऊत नक्की काय म्हणाले?

‘तीन भिन्न पक्षाचे लोकं एकत्र आले आणि सरकार चालवले. त्यांच्यामध्ये उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीने सरकार चालवताना समन्वय आणि एकोपा होता. तोच समन्वय, तोच एकोपा हा विरोधी पक्षात काम करताना असायला हवा. तरच आपण पुढल्या सर्व लढाया एकत्रपणे लढू शकतो,’ असे संजय राऊतांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.

(हेही वाचा – सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार का?, याचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले..)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.